दरवर्षीची ईद आणि बिग बजेट चित्रपट असे समीकरण सलमान खानने कायम यशस्वी केले आहे. यंदा ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या सुलतान चित्रपटाने पहिल्याच दिवशी यावर्षातली विक्रमी कमाई करण्याचा मान पटकाविला आहे.
हरयाणवी पैलवानाची भूमिका साकारलेल्या सलमान खानने या वेळी पडद्यावर खरी खेळातली ‘अ‍ॅक्शन’ रंगवली असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पण सलमानसाठी फॅन मुमेण्ट ठरेल अशी घटना समोर आली आहे. एका प्रेक्षकाने आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी सुलतानचा पूर्ण शो बुक केला होता.  हिमाचल प्रदेश येथील हमीरपूर शहरात राहणा-या शंकर मुसाफिर याने सुलतान प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी चित्रपटगृहातील १२० जागा बुक केल्या. शंकर याची पत्नी गितांजली ही सलमानची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे शंकरने संपूर्ण चित्रपटगृह बुक करून आपल्या पत्नीवर छाप पाडण्याचे ठरवले.
दरम्यान, ईदच्या आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या या वर्षीच्या पहिल्या चित्रपटाने तिकीटबारीवर ३६.५४ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करत त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर बॉलीवूडलाही ईदची मोठी भेट दिली आहे. दोन दिवसांत या चित्रटपटाने जवळपास ७५ कोटींचा गल्ला जमविला आहे.