या वर्षाची सुरुवात झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटीच्या घटस्फोटाची किंवा ब्रेकअपची बातमी ऐकायलाच मिळत आहे. आता या सेलिब्रेटींमध्ये आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री मानसी साळवी आणि तिचे पती दिग्दर्शक हेमंत प्रभू घटस्फोट घेणार आहेत.
‘सती.. सत्य की शक्ती’ च्या सेटवर मानसी आणि हेमंतचे प्रेम जुळले. त्यानंतर त्यांनी २००५ साली प्रेमविवाह केला. मानसी आणि हेमंत यांच्या लग्नाला ११ वर्षं झाली असून त्यांना आठ वर्षांची मुलगीही आहे. मानसी आणि हेमंत गेले एक वर्षं वेगळे राहात असून त्यांनी आता घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्य वृत्तानुसार, मानसीने त्यांचे गोरेगाव येथील राहते घर सोडले असून ती आता भाड्याच्या घरात राहत आहे. या दोघांनीही त्यांचे लग्न टिकवण्याचा बराच प्रयत्न केला. पण काही गोष्टींमुळे अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दोघांमध्ये कोणतेही वाद नसून त्यांनी संगनमताने घटस्फोट घेण्याचे ठरवलेय.
मानसीने स्टार प्लसवरील ‘प्यार का दर्द है मिठा मिठा’ या मालिकेत शेवटचे काम केले होते.