नावाजलेला बॉलिवूड कलाकार मनोज बाजपई लवकरच राम गोपाल वर्माच्या बहुप्रतिक्षित सरकार या सिनेमाच्या तिसऱ्या भागात दिसण्याची शक्यता आहे. मनोजने दिलेल्या माहितीनुसार ‘सरकार ३’ मध्ये तो एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये माध्यमांशी बोलताना मनोजने ही माहिती दिली. मनोजने याआधी राम गोपाल वर्मासोबत ‘सत्या’, ‘कौन’ आणि ‘रोड’ यांसारखे सिनेमे केले. माझे रामूसोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. आम्ही एकमेकांना फार वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे जेव्हा रामूने मला गोविंद देशपांडेच्या व्यक्तिरेखेबद्दल विचारले तेव्हा मी लगेच होकार दिला. ‘सरकार ३’मध्ये अमिताभ बच्चन सुभाष नागरेची प्रमुख भूमिका साकारताना दिसेल तर यामी गौतमचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमात मनोज बाजपईची व्यक्तिरेखाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित असेल. सिनेमात जॅकी श्रॉफ, रोनित रॉय आणि भरत दाभोळकर यांचीही भूमिका असणार आहे. मामि चित्रपट महोत्सवात मनोज बाजपईचा ‘आउच’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. मनोजच्या मते, त्याला लघुपटांमध्ये काम करणं फार आवडतं. अनेकवेळा लघुपटांमध्ये काम करण्याचे त्याला फारसे पैसेही मिळत नाही. तरीही त्याला फारसा काही फरक पडत नाही. हा लघुपट दोन लग्न झालेल्या सह-कर्मचाऱ्यांवर बेतलेला आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करण्याचा निर्णय घेतात. दोघंही एकाच दिवशी आपल्या जोडीदाराला ही गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतात. ‘अ वेनस्डे’, ‘स्पेशल २६’ आणि ‘एमएस धोनी’ यांसारखे यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या नीरज पांडेने आउच हा लघुपट दिग्दर्शित केला आहे.