प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडतोच. कधी हे प्रेम व्यक्त होतं, तर कधी आयुष्यभर अव्यक्तचं राहतं, पण काहीही असलं तरी प्रत्येकाची एक लव्हस्टोरी असतेच..! सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय ती अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या लव्हस्टोरीची.

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम अभिनेता म्हणून भूषणकडे पाहिलं जातं. तर पल्लवी पाटील ही उत्तम अभिनेत्री असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. ‘पिंजरा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला भूषण सध्या पल्लवी पाटीलच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या ‘LoveStory’ची चांगलीच चर्चा रंगत आहे.

‘सांग सजणी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु’ असं म्हणत भूषण सध्या पल्लवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसतोय. भूषण आणि पल्लवीची फुलणारी ही लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातील नसून व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या आपली ‘Love Story’ या अल्बमच्या एका गाण्यासाठी आहे.

वाचा : कोई मिल गया: ‘जादू’च्या मुखवट्यामागील खरा चेहरा

 व्हिडिओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या आपली Love Story या गाण्यात भूषण आणि पल्लवीचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतोय. नुकतचं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याचं लाइव्ह ध्वनीमुद्रण झाले असून या गाण्याला ऋषिकेश रानडे व किर्ती किल्लेदार यांचा स्वरसाज चढला आहे.  ‘प्रत्येकाला पुन्हा एकदा प्रेमात पडावसं वाटेल असं हे गाणं करताना खूप मजा आली’, असं भूषण आणि पल्लवीने सांगितलं. कलाकारांसोबत गायकांनासुद्धा प्रमोट करणार हे गाणं करायला मिळाल्याचा आनंद ऋषिकेश रानडे व कीर्ती किल्लेदार यांनी व्यक्त केला.

सचिन आंबट यांनी लिहिलेलं हे रोमँटिक अंदाजातील गाण्याला रोहित ननावरे आणि विकी अडसुळे यांचे सुमधूर संगीत लाभले आहे. या गाण्याचे छायांकन अमोल गोळे तर संकलन गुरु पाटील, महेश किल्लेकर यांचे आहे.