शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा टीझर अभिनेता अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी एका दिमाखदार कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आल्यापासूनच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, चित्रपटाचे पोस्टर मराठीऐवजी इंग्रजीत प्रदर्शित करण्यात आल्याने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवीण यांनी आज दुपारी ‘ठाकरे’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्यासोबत एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी शिवसेनेला थेट सवाल केला आहे. त्यांनी लिहिलं की, ‘माझ्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचं पोस्टर मी इंग्रजीत केलं म्हणून शिवसेनेच्या काही मान्यवर नेत्यांनी फोन करून ते मला मराठीत करायला सांगितलं… मी सुध्दा त्यांचं ऐकलं होतं … या पोस्टर बाबत शिवसेना काय करणार …?’ याविषयी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने प्रवीण तरडेंशी संपर्क साधला. त्यावर, ‘हे प्रकरण आता माझ्यासाठी संपले आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ”देऊळ बंद’च्या वेळी शिवसेनेसोबत किरकोळ वाद झाला होता. पण, ‘ठाकरे’ चित्रपटाचे पूर्ण पोस्टर इंग्रजीत प्रदर्शित करण्यात आले आहे. याविषयी नुकतेच माझे शिवसेनेतील योग्य त्या व्यक्तींशी बोलणे झाले आहे. त्यामुळे आता कोणीही हा वाद अधिक चिघळू नये’, असे प्रवीण ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हणाले.
‘ठाकरे’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, त्याच्या निवडीविषयी काहींच्या मनात साशंकता होती. टीझर लाँचवेळी खरंतर नवाजुद्दीन कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच्या शुभेच्छांची ध्वनीचित्रफित मात्र कार्यक्रमात दाखवण्यात आली. मी मराठी भाषिक नसलो तरी ही भूमिका आणि मराठी भाषा साकारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे बळ देतील, असे सांगत मिळालेल्या संधीबद्दल त्याने मराठी भाषेतून सर्वांचे आभार मानले.
शिवसेना खासदार संजय राऊत हे या चित्रपटाचे निर्माते असून, मनसे नेते आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. २३ जानेवारी २०१९ म्हणजेच बाळासाहेबांच्या जन्मदिनी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चैताली गुरव, chaitali.gurav@loksatta.com