मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते चर्चेत येण्यामागील कारण आहे युट्यूबवर अपलोड करण्यात आलेले एक गाणे. ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या नावाने अपलोड करण्यात आलेल्या या गाण्यावरून महागुरू सचिन पिळगावकर यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीचे असणाऱ्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाउंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबईतील जीवनशैलीवर आधारित असलेले हे गाणे सचिन पिळगावकर यांनीच गायले आहे. मात्र गाण्याची शब्दरचना, संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे ते ट्रोल होत आहे. अनेकांनी सचिन पिळगावकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओखालील कमेन्टसही एकदम मजेदार असून अनेकांनी पिळगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आमची मुंबई’ अल्बममधील या गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकील अन्सारी यांनी केली असून व्हिडीओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे. या व्हिडीओखालील डिस्क्रीप्शननुसार ‘मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हिच वैशिष्ठ्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असं म्हणत या गाण्याचा आस्वाद घ्या असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मात्र मुंबईचे स्पिरीट सेलिब्रेट करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे गाणे नेटकऱ्यांना फारसे आवडलेले दिसत नाही. या व्हिडीओखालील कमेन्टमधून त्याची झलक मिळते. ‘हे गाणे ऐकल्यानंतर मी केरळला जातोय कायमचा…’ या कमेन्टला अनेकांनी लाईक केले आहे. तर अक्षय शिंदेने आपल्या कमेन्टमधून सचिन पिळगावकरने आयुष्यभर कमावलेली सगळी इज्जत अब्रू घालवल्याचे म्हणत भोजपुरी गाणी सुद्धा या गाण्यापेक्षा भारी असतात असे म्हटले आहे. तर हे गाणे का बनवले आहे. बरं बनवलं ठिकं आहे पण युट्यूबवर का अपलोड केले आहे असा सवाल योगेश जी यांनी आपल्या कमेन्टमध्ये म्हटले आहे. शुभांकर महाजन याने हे गाणे पाहून, ‘पुणे की मुंबई हा वाद कायमचा मिटल्याचे सांगत पुणेच उत्तम’, असल्याचे अधोरेखित केले आहे. तर अक्षय लोकारे यांनी सचिन पिळगावकर यांच्या अशा वागण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आलेला सुवर्णकाळ जाऊन परत तांब्या-पितळ्यांचे दिवस येतील अशी खोचक कमेन्ट केली आहे. सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ गाण्याऐवजी कमेन्टसाठी जास्त व्हायर होत असल्याचे दिसून येत आहे.

 
१३ दिवसात या व्हिडीओला १२ हजारहून अधिक हिट्स मिळाले असले तरी केवळ ८८ जणांनी त्याला लाईक केले आहे. तर अनलाईक करणाऱ्यांची संख्या ५१२ इतकी आहे. यावरूनच या व्हिडीओबद्दलची नाराजी दिसून येते.