मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष आणि टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाच्या गजरात ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ या मराठी चित्रपटाचा भक्तीमय सोहळा देहू नगरीत नुकताच रंगला.
डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या असा वेश परिधान करून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपात देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरात पोहोचले आणि हा सोहळा उपस्थितांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार असून त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी अमृतवाणीने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली आणि जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ चित्रपट ७ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज ही निर्मिती संस्था चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, तर दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे.
अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गांधी यांनी चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे. तसेच योगेश सोमण यांच्यासह मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र, नूपुर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदी कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम – कथा संत तुकारामांच्या गाथेची…’ या चित्रपटातून समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात की, ‘संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये आध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचे अत्यंत सुंदर सार दडलेले आहे. जगद्गुरूंचे हे तत्त्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आमच्या या प्रयत्नांना पॅनोरमा स्टुडिओज या निर्मिती संस्थेची भक्कम साथ लाभली आहे. त्यासाठी मी त्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे’.
तर ‘लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क प्रादेशिक चित्रपटांमध्ये पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात. एका चांगल्या संकल्पनेसोबतच उत्तम चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी पॅनोरमा स्टुडिओज नेहमीच कटिबद्ध असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे अध्यक्ष कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. तर दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंतांमुळे चित्रपटासोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( डिस्ट्रिब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी यांनी सांगितले.