आजूबाजूला सातत्याने ताणतणाव निर्माण करणाऱ्या, हतबलता- उदासीनतेची जाणीव करून देणाऱ्या गोष्टींची गर्दी असतानाही उपेक्षित समाजाला पुढे नेण्याच्या उद्देशाने छोटे छोटे का होईना ठोस प्रयत्न करणारी द्रष्टी माणसंही आहेत, ही जाणीवही सुखावणारी असते. सुपरहिरोंच्या काल्पनिक कथा पाहतानाचा आनंद आणि वास्तवात कोणासाठी तरी सुपरहिरो ठरणाऱ्या व्यक्तींची प्रेरक कथा सांगणारा चित्रपट पाहतानाची जाणीव किती वेगळी असते, याचा अनुभव ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट देतो. शिवराज वायचळ या तरुण दिग्दर्शकाचे लेखन-मांडणी असलेल्या या चित्रपटात केवळ एका व्यक्तीच्या प्रयत्नांची गोष्ट नाही, तर आहे त्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी मिळालेली संधी घेत स्वत:च स्वत:ला बदलणाऱ्या सामान्य माणसांच्या प्रयत्नांचंही कोलाज या गोष्टीत असल्याने चित्रपट आणखी एक पाऊल पुढे नेणारा ठरला आहे.
कलात्मकता आणि व्यावसायिक मसाला मनोरंजन ही दोन्ही गणितं साधत मुंबई महापालिका या भल्या मोठ्या यंत्रणेचा आयुक्त आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे स्वत:च्या आर्थिक-सामाजिक स्थितीतून दोन पावलं का होईना पुढे गेलेले चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांची कथा या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी रंगवली आहे.
स्वत: उत्तम अभिनेता असलेल्या शिवराजचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्याने याआधी प्रायोगिक रंगभूमीवर दिग्दर्शन केलं आहे, पण चित्रपट दिग्दर्शनातील त्याचं पहिलेपण अजिबात जाणवणार नाही इतकी सफाईदार मांडणी त्याने केली आहे. खरं तर एका अधिकाऱ्याने त्याच्या अधिकाराच्या कक्षेत राहून घेतलेल्या ठोस निर्णयाची वास्तव गोष्ट मांडताना ती कोण्या एकाची चरित्रात्मक कथा किंवा केवळ घटनाक्रम मांडत रंगवलेली कथा अशा पद्धतीची होऊ शकली असते. मात्र, इथं ती मांडताना लेखक आणि दिग्दर्शक म्हणून शिवराजने केलेला वेगळा विचार जाणवतो. ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात उदात्त हेतूने केलेल्या प्रयत्नांची नुसतीच भलामण नाही, तर अधिकारी म्हणून त्या व्यक्तीचा उद्देश, तत्त्वांवर ठाम राहत निर्भीडपणे घेतलेले निर्णय आणि सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने कार्यरत राहण्याची त्यांची सहजता आपल्याला दिग्दर्शक दाखवतोच. मात्र, ज्यांच्यासाठी हे प्रयत्न केले गेले त्या सामान्य माणसांच्या गोष्टींवर दिग्दर्शकाने अधिक भर दिला आहे.
दहावी नापास असलेल्या काही कर्मचाऱ्यांना आपलं काम सांभाळून रोज रात्रशाळेत शिक्षण घ्यायचं आणि दहावीची परीक्षा द्यायची, असा आदेश महापालिकेचे आयुक्त देतात. आता ज्या कर्मचाऱ्यांची नावं यात आहेत त्यात भिन्न वयोगट असलेली, भिन्न जडणघडण असलेली, पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत कार्यरत असलेली माणसं आहेत. कोणी मुंबईतली गटारं साफ करणारा कर्मचारी आहे, कोणी रस्त्यावरचे साफसफाई करणारे कर्मचारी आहेत, कचरा वाहून नेणारे आहेत, कोणी पालिकेच्या पाणी विभागात काम करणारे आहेत. या प्रत्येकाचं कामाचं स्वरूप, रोजच्या रोज शहराचा चेहरामोहरा सांभाळणाऱ्या या माणसांना समाजाकडून मिळणारी वागणूक, कामातल्या अडचणी, व्यवस्थेतला भ्रष्टाचार आणि प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती- घरातल्या वातावरणानुसार त्यांची त्यांची सुख-दु:खं घेऊन वावरणाऱ्यांची व्यक्तिचित्रं एकाच वेळी दिग्दर्शकाने स्वतंत्रपणे उभी केली आहेत. त्याचबरोबर मुख्य कथेशी या पात्रांना जोडून ठेवत तीही सहजतेने प्रभावी नेताना सगळ्याची उत्तम गुंफण दिग्दर्शकाने केली आहे. त्यामुळे एकाच गोष्टीतून खूप काही ओघाओघात दिग्दर्शक मांडत जातो आणि प्रेक्षकही आपापल्या परीने ते टिपत राहतात.
चित्रपटाच्या दिग्दर्शकीय मांडणीतली आणि कलाकारांच्या अभिनयातली सहजता हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. आयुक्तांच्या भूमिकेसाठी अभिनेते आशुतोष गोवारीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि देहबोलीचा प्रभावीपणे वापर यात करून घेतला आहे. अतिशय संयत आणि खूप काही न बोलता नजरेतून, कृतीतून सगळं सांगून जाणारी ही भूमिका गोवारीकर यांनी सहजतेने रंगवली आहे. अभिनेते भरत जाधव यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली आहे. मंचेकरच्या भूमिकेसाठी पहिल्या दृश्यचौकटीपासून त्यांनी स्वीकारलेली देहबोली, सगळ्यांना सांभाळून घेणारा ज्येष्ठ कर्मचारी, घरात घुसमटलेला सासरा, नातवाच्या मनात प्रेमाचं स्थान मिळावं म्हणून धडपडणारा आजोबा… खूप सुंदर भावछटा आणि काही उत्तम प्रसंग त्यांनी दिले आहेत. सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर, किरण खोजे, प्राजक्ता हनमघर यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा अभिनयही वाखाणण्याजोगा आहे. एखादी वास्तव प्रेरक कथा सांगण्यामागचा लेखक- दिग्दर्शकाचा उद्देश स्पष्ट असेल तर मांडणीतही तो जाणवतो. ‘आता थांबायचं नाय’ हा त्या अर्थाने एक वास्तवात घडलेली प्रेरक कथा लोकांसमोर आणताना, तो तितकाच रंजकही वाटेल अशा पद्धतीची मांडणी असलेला दिग्दर्शकाचा प्रामाणिक चित्रप्रयोग आहे.
आता थांबायचं नाय
दिग्दर्शक – शिवराज वायचळकलाकार – आशुतोष गोवारीकर, भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, ओम भूतकर, किरण खोजे, प्राजक्ता हनमघर, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी.