सध्या चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘गालिब’ हे नाटक रंगभूमी गाजवतं आहे. ‘गालिब’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे. अशातच इंडस्ट्रीत लेखक मिळत नाही, यासंदर्भात भाष्य करत लेखकांना मिळणाऱ्या मान व धन याविषयी चिन्मय मांडलेकरने खंत व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकरने ‘अजब गजब’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चिन्मय म्हणाला, “इंडस्ट्रीत लेखक मिळत नाही ही अनादी अनंत काळापासून तिच रड आहे. लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही. वर्षानुवर्षे लोक हेच म्हणतात, इंडस्ट्रीत लेखक नाहीये. पण जो आहे त्याचं नाव तुम्हाला पोस्टरवर पण द्यायचं नाही. तुम्हाला कॉरिओग्राफरचं नाव पोस्टरवर द्यायचं आहे. तुम्हाला गीतकाराचं नाव पोस्टरवर द्यायचं. पण लेखकाचं नाव पोस्टरवर नाही. त्याच्यासाठी भांडण करावं लागतं. एखादी मानाची संस्था आलीच त्याच्यासाठी की, लेखकाला मान मिळाला पाहिजे म्हणून तर लिहिलं जातं. पण आजही बघा, अनेक ठिकाणी पोस्टरवर लेखाचं नाव नसतं.”

हेही वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…

“याचं अजून एक महत्त्वाचं कारण मुळात लेखन ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी गुंतवलं पाहिजे, हे इंडस्ट्रीला कळायला खूप उशीर लागला. आताही ते १०० टक्के वाटतं अशातला भाग नाही. मी एक उदाहरण देतो, माझ्या एका मित्राने एक चित्रपट लिहिला. त्याचं त्याला मानधन मिळालं. नंतर त्याला असं कळलं, त्या चित्रपटात एक आयटम साँग होतं. ते आयटम साँग करणारी जी कलाकार होती, तिला त्याच्यापेक्षा तिप्पट मानधन मिळालं. पाच मिनिटांचं गाणं करण्यासाठी तेवढं मानधन दिलं. बरं ती असं नाही की कतरिना कैफ होती. ती फार मोठी स्टार नव्हती. ती फक्त डान्सर होती. हा प्रोब्लेम आहे. मान आणि धन या दोन्ही बाबतीत लेखकांचा प्रोब्लेम आहे.”

हेही वाचा – मुग्धा वैशंपायन लवकरच श्रोत्यांसाठी घेऊन येतेय एक खास गोष्ट, पोस्ट करत म्हणाली, “मी स्वतः…”

पुढे चिन्मय म्हणाला, “लेखक का नाहीत? तर मला माहित नाही. आपण इंडस्ट्री म्हणून लेखकांमध्ये गुंतवणूक नाही केली. आणि गुंतवणूक म्हणजे काय? तर जे चांगले लेखक आहेत, त्यांना तुम्ही बरं मानधन दिलं पाहिजे. मला एस्पिरेशन वाटलं पाहिजे ना. मी जर उद्या काहीतरी लिहून घेऊन गेलो. तर मला सुरुवातीला सर, सर करून बोलतील. तेव्हा आपल्याला असं वाटतं आपणचं महत्त्वाचे आहोत. जसजसा चित्रपट तयार होतो, प्रमोशन सुरू होतं, तसा लेखक दुरावतो. प्रदर्शनाला लेखक कुठेतरी एका कोपऱ्यात पास काढून बसलेला असतो. मी जर अभिनेता नसतो तर मला जो लेखक म्हणून मान मिळतोय त्याच्या अर्धाही मिळाला नसता. रिअ‍ॅलिटी शो वगैरे असतात त्यात ते हेच सांगतात ज्या लेखकांना फेस व्हॅल्यूव आहे त्यांनाच आणा. रिअ‍ॅलिटी शोमध्ये ९९ टक्के लेखक नसतो. चिन्मय मांडलेकर असतो कारण तो अभिनेता आहे. जर मी फक्त लेखक असतो तर मला शंका आहे मला बोलावलं असतं का?”