‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या चमूने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळा संवाद साधला. या संवादसत्रात लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी, प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर आणि ईशा डे हे कलाकार सहभागी झाले होते.

ढवळे आणि माने अशा दोन मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची गोष्ट आणि आजच्या काळातील जगणं ‘गुलकंद’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन कुटुंबांतील मुले एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर कांदेपोहेंचा कार्यक्रम होतो, तेव्हा लक्षात येतं की एका कुटुंबातील आई आणि एका कुटुंबातील वडील हे महाविद्यालयीन जीवनातील जुने मित्र आहेत. त्यानंतर ढवळे आणि माने कुटुंबीयांमध्ये नेमकं काय घडतं? मोबाइल काय करामती करतो आणि त्याच्यामुळे माणसं कशी जवळ येतात? त्यातून काय गोंधळ उडतो? या सर्व घडामोडी एका कौटुंबिक विनोदी कथेच्या माध्यमातून ‘गुलकंद’ चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत, असं लेखक सचिन मोटे यांनी सांगितलं.

मध्यवर्ती भूमिका साकारल्याचा आनंद

‘गुलकंद’ या चित्रपटात पहिल्यांदाच नायकाची मध्यवर्ती भूमिका करायला मिळाली. मध्यवर्ती भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. थोडी उशिरा ही भूमिका मिळाली याचं मला दु:ख वाटत नाही, कारण आजवर मी प्रत्येक कामाचा आनंद घेत आलो आहे. ‘गुलकंद’मधील मकरंद ढवळे या व्यक्तिरेखेचा सूर माझ्यातही मला जाणवतो, त्यामुळे या भूमिकेचा गाभा मला सहज जाणून घेता आला. आणि माझं काही चुकलं-माकलं तर सांगणारे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे दोघंही बरोबर होते. सगळे कलाकार परिचयाचे होते. त्यामुळे मनसोक्त काम करता आलं. या सगळ्यांबरोबरचं रोजचं मैत्रीचं रसायन असल्याने पडद्यावर काम करताना ते खुलून आलं आहे, असं अभिनेता समीर चौघुले यांनी सांगितलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांचा मला सहवास जास्त लाभला, आमची मैत्री खूप जुनी आहे. या कार्यक्रमात सादर होणारे छोटे-मोठे प्रहसन हे सादरीकरणातही उत्तम असावे, यासाठी ते खूप बारकाईने विचार करतात, खर्चातही कोणतीच कसर ठेवत नाहीत. त्यामुळे चित्रपट करतानाही निर्मितीपासून प्रत्यक्ष कलाकृती पडद्यावर उत्तम पद्धतीने येणार याची खात्री होती. शिवाय, या दोघांचीही चित्रपट लेखन-दिग्दर्शनाची पद्धत, निर्मितीची प्रक्रिया जवळून अनुभवायची होती, त्यामुळे या चित्रपटाला मी लगेच होकार दिला, असं अभिनेता प्रसाद ओक यांनी सांगितलं. सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाहीत हे वारंवार बोलले जाते, पण म्हणून प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली हे म्हणणं योग्य वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. सध्या निर्माते व दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूर्वक वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करत आहेत, ही जमेची बाजू आहे. त्यामुळे विषय व तंत्रज्ञांची कमतरता आपल्याकडे नाही. प्रेक्षकही त्यांना आवडतील, तेच चित्रपट पाहतात. त्यामुळे प्रेक्षकांची आवडनिवड लक्षात घेऊन चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे, असं प्रसाद ओक यांनी सांगितलं.

प्रत्येक प्रेमकहाणी एका साच्यात बांधून सहकुटुंब पाहता येईल, असा चित्रपट तयार करण्याचं बंधन आमच्यावर नव्हतं. अनेकदा चित्रपट दिग्दर्शक व निर्माते हे दोन व्यक्तींच्या प्रेमकहाणीचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. लग्नाच्या २५ वर्षांनंतर जुने मित्रमंडळी एकत्र येणं आणि आठवणींना उजाळा देणं, अशी एक साधीसरळ कथा ‘गुलकंद’मध्ये आहे. अनेकदा सामाजिक परिस्थिती किंवा कौटुंबिक कारणास्तव मनातील बोलता येत नाही, परंतु रियुनियनच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि मनमोकळेपणाने संवाद साधतात. एकेकाळी प्रेमात पडलेले दोघंजण खूप वर्षांनी समोरासमोर भेटल्यावर नेमकं काय होतं? कुटुंबांचा दृष्टिकोन कसा असतो? असे वेगवेगळे पैलू यात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असं दिग्दर्शक गोस्वामी यांनी सांगितलं.

मी साकारलेली नीता ढवळे ही व्यक्तिरेखा आजच्या काळातील कार्यालयीन काम करणारी, स्वत:चं महत्त्व जपणारी, कुटुंबाला सांभाळून पुढे जाणारी स्त्री आहे, असं अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितलं.

आणि खचून गेले

‘हास्यजत्रा’मधून रोज स्वत:ला सिद्ध करणं हे एक आव्हानच आहे. अनेकदा हातून निसटल्यासारखं वाटू शकतं. अलीकडे तीन ते चार महिने मला काम करताना माझा सूर सापडत नव्हता. मी चांगला अभिनय करू शकते, तरीही आपल्याकडून प्रभावी काम होत नाही आहे हे मनोमन वाटत राहायचं. आपल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रहसनं नीट होत नाहीत, असं वाटत होतं. त्यामुळे मी थोडी विश्रांती घेते, असं निर्मात्यांना जाऊन सांगणार होते. त्याच वेळी एके दिवशी प्रहसनाची उत्तम तालीम करूनही प्रत्यक्ष दृश्य चित्रित होताना मात्र मी पाच वेळा अडखळले. त्या क्षणी मी खचूनच गेले आणि मेकअप रूममध्ये आल्यानंतर मला रडू कोसळलं. त्यानंतर राऊत असो किंवा समीर दादा सर्वांनी समजावलं, उत्तम मार्गदर्शन केलं. त्यानंतरची प्रहसनं चांगली झाली, असा अनुभव अभिनेत्री ईशा डे हिने सांगितला.

निर्मात्यांमध्ये समन्वय आवश्यक

मराठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन प्रदर्शनाच्या तारखांसंदर्भात चर्चा करणे आवश्यक आहे आणि ही चर्चा झाल्याशिवाय एकाच दिवशी दोन ते तीन मराठी चित्रपट आमनेसामने येणे थांबणार नाहीत. ही चर्चा तातडीने व्हायला हवी. नियोजनबद्ध चित्रपट प्रदर्शनाच्या दृष्टीने काम करण्याची हीच महत्वाची वेळ आहे, असं स्पष्ट मत सई ताम्हणकरने व्यक्त केलं. मराठी चित्रपटसृष्टीचा उतरोत्तर विस्तार होणे आणि चित्रपटगृहात प्रेक्षक येणे, हे आपले मुख्य ध्येय आहे. खरंतर मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतात. त्यामुळे आर्थिक अपयशाचे सर्व खापर प्रेक्षकांवर फोडणे हीसुद्धा चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण नियोजनबद्ध सर्व गोष्टी केल्या तर सारे काही सुरळीत होईल.

शब्दांकन : अभिषेक तेली