scorecardresearch

चौथ्या आठवड्याच्या शेवटीही ‘वेड’चा जलवा कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४ आठवडे झाले असले तरीही चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

चौथ्या आठवड्याच्या शेवटीही ‘वेड’चा जलवा कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

३० डिसेंबर रोजी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि नावाप्रमाणेच या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने दमदार कामगिरी होती आहे. चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होताना दिसत आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४ आठवडे झाले असले तरीही चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं, तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलीया प्रेक्षकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.२५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील टॉप ५ दमदार ओपनिंग करणाऱ्या यादीत सामील झाला. अवघ्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमावला. आता नुकतंच या चित्रपटाच्या चौथ्या विकएण्डचा गल्ला किती हे समोर आलं आहे.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

गेल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला. तर आता हा आकडा ५५ कोटींच्या पार पोहोचला आहे. आता चौथ्या विकएण्डच्या शुक्रवारी या चित्रपटाने १.३५ कोटी, शनिवारी १.३७ कोटी आणि काल म्हणजेच रविवारी या चित्रपटाने १.७५ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ५५.२२ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट अनेक बड्या चित्रपटांना टफ फाईट देताना दिसतोय. या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटाच्या टिझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 17:20 IST

संबंधित बातम्या