गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांमधून सातत्याने कोकणातल्या गोष्टी, विषय वा चित्रीकरणाच्या निमित्ताने तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडतं आहे. आता पुन्हा एकदा कोकणातल्या तरुणांच्या लग्नाचा विषय घेऊन एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेता वैभव मांगले आणि लेखक – अभिनेता प्रसाद कुडतरकर यांसारखे नावाजलेले कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कोकणातल्या तरुणांची न जमणारी लग्नं हा विषय घेत, माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या विजय कलमकर दिग्दर्शित चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून या चित्रपटात एक वेगळीच कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. एकीकडे अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेता वैभव मांगले, सुनील तावडे अशी नावाजलेली मंडळी आणि दुसरीकडे तरुण फळीतील लेखक – अभिनेता प्रसाद कुडतरकर, अभिनेता साईंकित कामत आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अशी नवी-जुनी कलाकार मंडळी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद – गीत लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शनासह संकलन विजय कलमकर यांनी केलं आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल एंटरटेन्मेंट काम पाहणार आहे. १९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.