‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. गेल्या काही दिवसांपासून गौरव हा ‘लंडन मिसळ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच गौरवने त्याला हा चित्रपट कसा मिळाला याबद्दल एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

गौरव मोरेने नुकतंच ‘रत्न मीडिया मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट नेमका कसा मिळाला, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मला हा चित्रपट मिळाला, असे सांगितले.
आणखी वाचा : Video : याला म्हणतात माणुसकी! अंशुमन विचारेचा महागडा फोन रिक्षा चालकाने केला परत! व्हिडीओ व्हायरल

“मी दिंडोशीच्या सिग्नलला उभा होतो. तिथून डावीकडे गोरेगाव फिल्मसिटीला जायला रस्ता आहे. मला सरळ घरी जायचे. पण मी चुकून गाडी दुसरीकडे वळवली. गाडी थोडी पुढे गेली आणि पाठीमागून एक गाडी आली. त्यानंतर त्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने मला दिसत नाही का, असे विचारले. मी देखील गाडीची काच खाली केली आणि असं कोण विचारतंय म्हणून विचारणा केली. तेव्हा गाडीत आमचे दिग्दर्शक बसलेले होते.

मी त्यांना पाहिलं आणि सर म्हटलं. त्यावेळी ते मला पटकन म्हणाले, गौऱ्या आपण एक चित्रपट करतोय. त्याचं शूटींग लंडनला होणार आहे. आपल्याला लंडनला जायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि सर्व माहिती सांगितली. त्यामुळेच लंडन मिसळ हा चित्रपट मला मुंबईच्या सिग्नलवर मिळालाय, असं म्हणतो”, असा गमतीशीर किस्सा गौरवने यावेळी सांगितला.

आणखी वाचा : “माझा गोड उमेश”, नवऱ्याच्या वाढदिवशी प्रिया बापटची रोमँटिक पोस्ट; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात गौरव मोरेबरोबर भरत जाधव, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.