७७वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ (Cannes Film Festival 2024) सध्या खूप चर्चेत आहे. या फेस्टिव्हलमधील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलीवूडचे बरेच सेलिब्रिटी कानच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरील स्टार्सने देखील कानच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आईची साडी अन् नथ घालून ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला पोहोचल्या होत्या. याचे सुंदर फोटो त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सध्या हिंदी सिनेसृष्टीत बोलबोला असलेल्या छाया कदम (Chhaya Kadam) आहेत. ‘कान फेस्टिव्हल’साठी छाया कदम १५ मेला मुंबईतून रवाना झाल्या. तेव्हा मुंबई विमानतळावरील फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आता त्यांनी ‘कान फेस्टिव्हल’ला पोहोचल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: राखी सावंतची यशस्वी झाली शस्त्रक्रिया, पूर्वाश्रमीच्या पतीने दाखवला ट्यूमर, खिल्ली उडवणाऱ्यांना दिला इशारा

आईची साडी, नथ, केसात गजरा, कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून छाया ‘कान फेस्टिव्हल’ला पोहोचल्या. त्यांनी सुंदर फोटो शेअर करत लिहिलं, “आई तुला विमानातून फिरवण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं…पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून ‘कान फिल्म फेस्टिव्हल’पर्यंत घेऊन आले, याचं समाधान आहे. तरी आई आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यू मम्मुडी आणि खूप खूप मिस यू.” ‘कान फेस्टिव्हल’मधील छाया कदम यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: पारू आणि आदित्यचं झालं लग्न! पण क्षणार्धात…; ‘पारू’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं वेधलं लक्ष

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘स्टार प्लस’च्या हिंदी मालिकेत ट्रॅक्टरवरून दमदार एन्ट्री, पाहा जबरदस्त प्रोमो

दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्यांच्या दोन हिंदी चित्रपटांची खूप चर्चा सुरू आहे. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारली आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. छाया यांचे चित्रपटातील बरेच डायलॉगचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. याशिवाय कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटात छाया कदम झळकल्या आहेत. या चित्रपटातील देखील त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे.