रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप-लेकामधील ताणलेलं नातं आणि त्या नात्यातून उभा राहणारा हिंसेचा जाळ असलेला चित्रपट सध्या चित्रपटगृहातून गाजतो आहे. त्याच्या अगदी उलट एकमेकांना समजून घेत, रुसवे-फुगवे सारं सांभाळूनही आनंदाने आयुष्य जगायला शिकवणाऱ्या, बापाच्या मायेची सय आणि मुलाची करिअरच्या ध्यासापोटी दिवसरात्र एक करत सुरू असलेली धावपळ या दोहोंचा तोल साधत एकमेकांवरचं प्रेम घट्ट पकडायला हवं हे सांगण्याचा उत्तम प्रयत्न विपुल मेहता दिग्दर्शित ‘ओले आले’ या चित्रपटात करण्यात आला आहे.

‘ओले आले’ हे शीर्षक जरा ऐकायला विचित्र आहे. ते तसं का आहे? यामागचा साधासरळ तर्क चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांतून लक्षात येतो. पण खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या कथेशी जोडून घेणारे असे हे नाव आहे. ओमकार आणि आदित्य लेले या बापलेकांची ही कथा आहे. सध्या प्रत्येक घरात दिसणारा, जाणवणारा, एका पिढीला प्रचंड सलणारा, त्यांना आतून रिकामं करत जाणारा आणि दुसऱ्या पिढीच्या दृष्टीने अस्तित्वातच नसलेला, उशिराने शहाणीव देणारा प्रश्न याही चित्रपटात आहे. आई-वडील आणि मुलांचं एकमेकांवर प्रेमच नाही आहे का? अनेकदा आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा व्यवहाराला, जोडीदाराच्या म्हणण्याला प्राधान्य दिलं जातं. या नादात कुठेतरी हरवलेला आई-वडिलांबरोबरच्या नात्याचा धागा उशिराने का होईना त्यांच्याही लक्षात येतो, पण तोवर उशीर झालेला असतो. सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावत सुटलेल्या पिढीला आपल्याकडे जे आहे त्याची एकतर जाणीव होत नाही किंवा तशी ती झाली तरी त्याला महत्त्व देण्याइतपत वेळ आणि भावही त्यांच्या मनात असतोच असं नाही. ज्यांच्या मनात ते प्रेम आहे, त्यांच्याकडेही आपल्या घरासाठी, नात्यांसाठी द्यायला वेळ नाही आहे. ओमकार लेले निवृत्त आयुष्य जगत आहेत. त्यांचा मुलगा आदित्य लेले हुशार आहे. जगभरात प्रत्येक महत्त्वाच्या शहरात आपला व्यवसाय असावा या ध्येयाने झपाटलेल्या आदित्यकडे स्वत:साठीही वेळ नाही. आदित्यने आयुष्य भरभरून जगावं, आपल्याला अगदी काही सेकंदांचा का होईना वेळ द्यावा इतकीच ओमकार लेले यांची अपेक्षा आहे. ते त्यासाठी सतत काहीतरी धडपड करू पाहतात, आदित्यशी संवाद साधत राहतात. आपल्यासारख्या मित्रांना समजून घेत त्यांनाही बिनधास्त जगण्याचा सल्ला देतात. मात्र ही कोंडी एका क्षणी नाईलाजाने फुटते. बाप-लेकाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. या दोघांच्या एकत्र येण्याचा, एकमेकांबरोबर आणि एकमेकांसाठी असण्याचा, आनंदाने जगण्याचा हा प्रवास म्हणजे ‘ओले आले’ हा चित्रपट.

हेही वाचा >>> Video : “पुणे तिथे काय उणे…”, माधुरी दीक्षितचा मराठी उखाणा ऐकून पती श्रीराम नेने म्हणाले…

विपुल मेहता यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केलं आहे. लेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीचं असलं की कथेतील सुसूत्रता कायम राखण्यास मदत होते. ‘ओले आले’ चित्रपटाच्या बाबतीत तर वडील आणि मुलाच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आहे. आणि हे लक्षात ठेवून अगदी शीर्षकापासून शेवटापर्यंत हे भान विपुल मेहता यांनी सांभाळलं आहे. त्यामुळे कथा म्हणून त्यात कितीही वळणं आली, काही अनपेक्षित गोष्टी असल्या, व्यक्तिरेखा असल्या तरी ओमकार आणि आदित्य लेले यांच्या गोष्टीपासून चित्रपट तीळभरही भरकटत नाही. नाही म्हणायला त्यामुळे मकरंद अनासपुरेंचा बाबूराव आणि सायली संजीवने साकारलेली गोड निरागस कायरा या दोन सुंदर व्यक्तिरेखा आणि कलाकार असतानाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पण चित्रपटाचा सगळा भर अर्थात ज्येष्ठ लेलेंची भूमिका साकारणारे अभिनेते नाना पाटेकर आणि युवा लेलेंच्या भूमिकेतील सिद्धार्थ चांदेकर यांच्यावर आहे. नाना पाटेकरांची भूमिका हीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असते, इथे तर अत्यंत सकारात्मक आणि विनोदी कोटया करत खळखळून हसणारे आणि हसवणारे वेगळे नाना अनुभवायला मिळाले आहेत. सिद्धार्थनेही हळव्या आदित्यची भूमिका सुंदर आणि सहजतेने रंगवली आहे. गणेश पंडित यांनी लिहिलेल्या चुरचुरीत संवादांमुळे आणि मंदार चोळकर यांची दोन वेगळया शैलीची गाणी, सचिन-जिगर यांचं संगीत, छायांकन या सगळया गोष्टींनी चित्रपटात जान आणली आहे. हसता हसता डोळयांच्या कडा ओलावणारा भावानुभव देणारे चित्रपट फार कमी असतात, ‘ओले आले’ हा अगदी परिपूर्ण चित्रपटांपैकी नसला तरी तो ही अनुभूती आणि जगणं खऱ्या अर्थाने आनंद करण्याची गरज अधोरेखित करून जातो.

ओले आले

दिग्दर्शक – विपुल मेहता कलाकार – नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे आणि तन्वी आझमी.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie review ole aale new marathi movie directed by vipul mehta zws
First published on: 07-01-2024 at 03:00 IST