Mrinal Kulkarni & Shivani Rangole : मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू-सुनेची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवानी आणि विराजस यांचा लग्नसोहळा २०२२ मध्ये थाटामाटात पार पडला होता. मृणाल कुलकर्णी शिवानीला आधीपासूनच ओळखत होत्या. या दोघींनी एका प्रोजेक्टदरम्यान एकत्र काम देखील केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यात पहिल्यापासून खूपच सुंदर बॉण्डिंग आहे.
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची जोडी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. या दोघींकडे पाहून प्रत्येकाला सासू-सुनेचं बॉण्डिंग असंच असावं असं वाटतं. प्रेक्षकांच्या या दोन लाडक्या अभिनेत्री आता पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. याबद्दल शिवानीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
शिवानी रांगोळे, मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता शिवराज वायचळ हे कलाकार गो.नी.दांडेकर यांच्या संत साहित्यावर आधारित ‘कोSहम्’ हे अभिवाचन सादर करणार आहेत. याचं दिग्दर्शन सुरज पारसनीस आणि स्वत: विराजस कुलकर्णीने केलं आहे. १७ जुलैला या अभिवाचन सादरीकरणाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत पार पडेल.
याविषयी माहिती देताना कलाकार सांगतात, “मी कोण आहे? आजच्या या आधुनिक जगामध्ये मी कोण आहे? या एकविसाव्या शतकातील रॅटरेसमध्ये मी कोण आहे? ग्लोबलायझेशन, सोशल मीडिया, टिकटॉक, रील्स या सगळ्या पलीकडे जाऊन मी कोण आहे? सुखात नाहीतर दु:खात मी कोण आहे? खरंच मी कोण आहे? कोहम! गो.नी.दांडेकर यांच्या संत साहित्यावर आधारित एक नवा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येतोय. अभिवाचन, नृत्य आणि नाट्य यासहित…१७ जुलैला रात्री ८ वाजता…द स्टुडिओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ( NMACC ) येथे…भेटूयात!”
दरम्यान, सिनेविश्वातील कलाकारांनी मृणाल कुलकर्णी व ‘कोहम’च्या संपूर्ण टीमला शुभारंभाच्या प्रयोगासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या अभिवाचन सादरीकरणात शिवानी व मृणाल कुलकर्णी यांच्यासह झळकणाऱ्या शिवराज वायचळबद्दल सांगायचं झालं, तर ‘आता थांबायचं नाय’ या सर्वत्र गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन शिवराजने केलं होतं. याशिवाय ‘बन मस्का’ या मालिकेत शिवानी आणि शिवराज यांनी एकत्र काम देखील केलं आहे.