मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली. गेल्या अनेक दिवसांपासून पूजाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधली. मुंबईत दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला मराठीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लग्नातील पूजा व सिद्धेशचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
लग्नात पूजाच्या लूकपासून तिच्या मंगळसूत्रापर्यंत सगळ्यांची चर्चा रंगली. मात्र, या लग्नसोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते पूजाची बहीण रुचिराने. रुचिराने पूजाच्या लग्नात बहिणीची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. पूजा व रुचिरामध्ये खास बॉन्डिंग आहे. रुचिरा ताईच्या लग्नाचा मनमुराद आनंद घेताना दिसली. मेहंदीपासून हळदीपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमात रुचिराचा पुढाकार होता. हळदी व संगीत कार्यक्रमातील पूजा व रुचिराचा डान्स व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर पूजाला हळद लावताना रुचिरा भावूक झाल्याचेही पहायला मिळाले.
आता ताई पूजा सासरी गेल्यानंतर रुचिराला तिची खूप आठवण येत आहे. रुचिराने सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्टही शेअर केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पूजाचा लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘मिस यू’ अशी कॅप्शनही दिली आहे. रुचिराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
लग्नातील पूजा व सिद्धेशच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगली होती. लग्नात पूजा व सिद्धेशने मराठमोळा लूक केला होता. पूजाने पिवळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली नऊवारी नेसली होती. नाकात नथ व सोन्याचे पारंपरिक दागिने घालत तिने हा लूक पूर्ण केला होता, तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर रिसेप्शनमध्ये पूजाने लाल रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली होती, तर सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती व त्यावर काळ्या रंगाची भरजरी शाल घेतली होती.