महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही राज ठाकरे यांना अनेकांनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. राजकीय क्षेत्रातील मंडळींसह अनेक कलाकार मंडळींनी राज ठाकरे यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनी राज ठाकरे यांच्यासाठी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तेजस्विनीने राज ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला. शिवाय त्यांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं. तेजस्विनी म्हणाली, “आदरणीय राजसाहेब ठाकरे, २० वर्ष झाली आपल्या परिचयाला… पण संवाद कदाचित हल्लीच झाला. मला तुमचं खूप कौतुक वाटतं. इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि वेळेच्या पुढे एका वेगळ्या दृष्टीने पाहणारा एकमेव नेता!”.

आणखी वाचा – राज ठाकरेंसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तुमच्या आयुष्यातील…”

“स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृंधिगत केलात… इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात. अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत. स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत. लाचारी पत्करली नाही. राजकारणात मैत्री आणली नाही आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. धकाधकीच्या जीवनामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात. आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलं”.

आणखी वाचा – “१५०० रुपये मानधन सांगून ७०० रुपये दिले अन्…” संकर्षण कऱ्हाडेने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाला, “मी ते पैसे त्यांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कधीच माघार घ्यायची नाही हा आत्मविश्वास इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात? राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात. काही ढाल धरून उभे राहतात. पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे. कारण कर नाही त्याला डर कशाला! मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत. तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं की, राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्देव आहे. तुमच्या सारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अशा अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं यासाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो. कोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब”. तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.