Raja Gosavi मराठी चित्रपटांचा कृष्ण-धवल काळ म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट काळ गाजवणाऱ्या सुपरस्टार्सपैकी एक सुपरस्टार म्हणजे राजा गोसावी. राजा गोसावींच्या सहज अभिनयाने ते लोकांची मनं जिंकत. मराठी चित्रपट आणि नाटक यामधून ते काम करत होते. मात्र त्यांचा उमेदीचा काळ संपला आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांच्यावर पुन्हा नाटकात काम करायची वेळ आली. तसंच एकेकाळी वैभव पाहिलेल्या या अभिनेत्याने पुढे दुर्दैवाचे दशावतारही पाहिले. राजा गोसावी यांच्या कन्या आणि अभिनेत्री शमा देशपांडे यांनी हा सगळा काळ उलगडला आहे. एकेकाळचं वैभव ते हलाखी या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

शमा देशपांडे काय म्हणाल्या?

“मी दोन्ही काळ पाहिले आहेत. प्रचंड वैभवही पाहिलं आहे आणि प्रचंड हलाखीही पाहिली आहे. आमच्या लहानपणी राज कपूर यांच्या मुलांचे कपडे कुलाब्याहून जिथून शिवून यायचे तिथून आमचे कपडे शिवून यायचे. आम्ही पाच बहीण भावंडं होतो. आम्ही झोपायच्या आधी आमच्या बेडरुममध्ये पाच नाईट सूट्स तयार असत. कुलाब्याहून आमचे कपडे शिवून यायचे. शिवाय आमच्यासाठी सात पुडांचा डबा यायचा. माझे वडील (अभिनेते राजा गोसावी) हे त्यांच्या शुटिंगमध्ये खूप व्यस्त होते. निर्मात्यांशी बोलणी, इतर व्यवहार आणि वडिलांना साथ देण्यासाठी माझी आई त्यांच्याबरोबर मुंबईत राहायची. तर आम्ही सगळी मुलं माझ्या आजीकडे पुण्यात राहायचो” असं शमा देशपांडे यांनी सांगितलं. शमा देशपांडे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत त्यांनी राजा गोसावी यांचा सुवर्णकाळ आणि नंतर त्यांच्या कारकिर्दीचा उतरता आलेख यावर भाष्य केलं.

पुण्यातल्या घरी पंचपक्कन्नांनी भरलेला डबा यायचा-शमा देशपांडे

शमा देशपांडे पुढे म्हणाल्या, “सणवार असताना आमच्या पुण्यातल्या घरी सात पुडांचा डबा जो पंचपक्वान्नांनी भरलेला असे तो आमच्याकडे काम करणारा माणूस पुण्यात टॅक्सीने आणायचा. बाहेरचे आमचे कपडे त्याच टॅक्सीने पुण्याहून मुंबईत लाँड्रीसाठी यायचे. माझे वडील जेव्हा दक्षिणेत शुटिंगला जात असत तेव्हा माझ्यापेक्षा मोठ्या भावाचे लॅक्टोजिनचे डबे विमानाने चेन्नईला जात असत. एवढी समृद्धी पाहिली” असं शमा देशपांडे म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी उतरती कळा कशी लागली तेदेखील सांगितलं.

राजा गोसावींच्या करिअरचा डाऊनफॉलही आम्ही पाहिला-शमा देशपांडे

इतकी समृद्धी पाहिल्यानंतर आम्ही राजा गोसावींची उतरती कळाही पाहिली. इतका डाऊनफॉल पाहिला की घरातले पितळेचे डबे विकून किराणा भरला जायचा. कानातल्या मागे असलेले सोन्याच्या फिरक्याही मारवाड्याकडे गहाण ठेवून घरात किराणा, भाजीपाला यायचा. त्यावेळी मोठा ब्रिटानियाचा ब्रेडचा पुडा आणि कढई भरुन आमटी, शेंगदाण्याची चटणी हे कित्येक दिवस आम्ही जेवत होतो. जिथे सात पुडाचा पंचपक्वान्नांनी भरलेला डबा मुंबईहून पुण्यात यायचा तो काळही पाहिला आणि ब्रेड खावा लागत असे तो काळही पाहिला आहे. जेव्हा सगळी सुख समृद्धी होती त्यावेळी अक्षरशः आईस्क्रीम पार्लरमधून आईस्क्रीमचं मशीन घेऊन तो मालक यायचा. इतकी समृद्धी, वैभव पाहिलं आणि त्याच काळात बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी खायला मिळाली तर लक्झरी वाटायची हा काळही पाहिला.

Raja Gosavi and his Wife
राजा गोसावी हे एक हरहुन्नरी नट होते. त्यांचा उमेदीचा काळ संपल्यानंतर काय घडलं ते त्यांच्या मुलीने म्हणजे शमा देशपांडे यांनी उलगडलं आहे. (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

या सगळ्या परिस्थितीने आम्हाला आयुष्याची शिकवण दिली-शमा देशपांडे

स्टार किड वगैरे आज आहे आणि उद्या नाही अशीच स्थिती असते. मात्र या परिस्थितीने आम्हाला जगायला शिकवलं. राजाचा रंक होताना आम्ही पाहिलं आहे. कितीतरी वेळा असं झालं घरात दिवाळी असताना ज्या टेलरकडून आम्ही कपडे शिवून आणायचो त्याची शिलाई देण्याची ऐपत नव्हती आणि दिवाळी संपल्यानंतर तो टेलर आमच्या इमारतीच्या खाली यायचा. तो टेलर खूप फेमस आहे आता, मी त्याचं नाव घेणार नाही. तो आम्हाला अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायचा. आम्ही आईला हळूच सांगायचो तू येऊ नकोस. तो गेल्यावर बाहेर बोलवायचो ही सगळी परिस्थिती आम्ही पाहिली. आम्हाला आयु्ष्याची शिकवणच त्या सगळ्या परिस्थितीने दिली. परिस्थिती कुणावरही येऊ शकते असंही शमा देशपांडे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजा गोसावी यांनी सगळी नाती शेवटपर्यंत निभावली-शमा देशपांडे

राजा गोसावी ही व्यक्ती अशी होती ज्यांनी मनाने विचार केला, डोक्याने विचार केलाच नाही. तो माणूस जाईपर्यंत २५ ते ३० लोक जगत होती. बहीण भावंडांना नातवंडं होईपर्यंत त्यांनी कुठल्याच नात्याची जबाबदारी राजा गोसावींनी झटकली नाही. माझ्या आईकडची नाती असोत, त्यांची नाती असोत किंवा त्यांनी जोडलेली नाती असोत त्यांनी शेवटपर्यंत ती नाती निभावली. असंही शमा देशपांडे यांनी म्हटलं आहे.