श्रीप्रसाद पदमाकर मालाडकर

“अभिनय सम्राट राजा गोसावी ” राजाराम शंकर गोसावी. सुप्रसिद्ध मराठी नाट्य,चित्रपट अभिनेते. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीचे ‘विनोदाचे राजा’. या अभिनय सम्राट राजा गोसावी यांचे आज पासून जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९२५ रोजी सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली तालुक खटाव ला झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. मेळे, गाणी, नकला आणि नाटके यांची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. नाट्य अभिनेते बाळ गोसावी हे राजा गोसावींचे धाकटे बंधू होते.

digpal lanjekar reaction on chinmay mandlekar chhatrapati shivaji maharaj role decision
“शिवराज अष्टकात महाराजांची भूमिका…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Kiran mane on shahu maharaj kolhapur
“कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना…,” किरण मानेंचा संताप; म्हणाले, “…तर मी उदयनराजेंना मत देणार नाही”

राजा गोसावी यांची कारकीर्द कशी सुरु झाली?

सुरुवातीला राजा गोसावी नटश्रेष्ठ गंगाधरपंत लोंढे यांच्या ‘ राजाराम संगीत नाटक’ मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या चित्रपट निर्मिती संस्थेत लहानमोठी कामे करत होते. ‘माझं बाळ’ या चित्रपटाच्या सुरुवातीला एक जोडपं लहान मुलाची गाडी घेऊन जाताना दिसतात; ते राजा गोसावी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना आहेत. माझं बाळ, चिमुकला संसार, बडी माँ नंतर राजा गोसावी, नाट्य चित्र सृष्टीतले ज्येष्ठ विनोदी अभिनेते दामुअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर नाट्य मंदिरात’ प्रॉम्प्टरचे काम करायला लागले. नाट्य सृष्टीत राम गणेश गडकरी यांच्या संगीत भावबंधन या नाटकात त्यांनी प्रथम रखवालदाराची भूमिका केली. त्यानंतर याच नाटकातील विविध भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली.

तिकिट विक्रेता ते अभिनेता

पुण्यातल्या ‘भानुविलास’ या चित्रपटगृहामध्ये तिकीट खिडकीवर तिकिट विक्रेता हे काम केले. सन १९५२ मध्ये दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या विनोदी चित्रपटा द्वारे राजा गोसावी यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली. मुलीच्या वडिलांच्या एक लाख रुपये एका महिन्यात खर्च करून दाखवण्याच्या विचित्र अटीमुळे नायकाची आणि त्याच्या मित्राची होणारी तारांबळ यातून या चित्रपटात विनोद निर्मिती केली आहे. दिग्दर्शक राजा परांजपे सह सह कलाकार रेखा : कुमुद सुखटणकर, चित्रा: कुसुम सुखटणकर, ग. दि. माडगूळकर, शरद तळवलकर होते.अडचणीत असलेल्या जीवलग मित्राला बाहेर काढण्यासाठी केलेली धडपड यात त्यांनी अचूक साकारली. ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली गीते आणि आशा भोसले, मालती पांडे आणि सुधीर फडके यांचे पार्श्वगायन : सांग तू माझा होशील का, त्या तिथे पलिकडे, पहिले भांडण केले कोणी, डोळ्यात वाच माझ्या ही गाणी असलेला चित्रपट प्रेक्षकांना आवडला.

राजा गोसावी यांच्या अभिनय छटा लोकांना आवडल्या

राजा गोसावी यांचा सहज सुंदर अभिनय मन मोहक आहे. हा चित्रपट ‘भानुविलास’ चित्रपटगृहामध्ये लागला, तेव्हा एक दिवसा करिता स्वत:च्याच चित्रपटाची तिकिटे त्यांनी विकली होती. त्यानंतर अबोली, महात्मा, बोलविता धनी, सौभाग्य सन १९५३, शुभमंगल, बेबी सन १९५४, पुनवेची रात, गंगेत घोडं न्हालं सन १९५५, आंधळा मागतो एक डोळा, जगावेगळी गोष्ट सन १९५६ गाठ पडली ठकाठका, आलिया भोगासी, देवघर, कन्यादान, झालं गेलं विसरून जा सन १९५७, दोन घडीचा डाव सन १९५८,अवघाची संसार, पैशांचा पाऊस, श्रीमान बाळासाहेब, लग्नाला जातो मी, सन १९६०, वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी सन १९६२, वाट चुकलेले नवरे सन १९६४, कामापुरता मामा सन १९६५, येथे शहाणे राहतात सन १९६८, या सुखांनो या सन १९७५ अशा अनेक विनोदी, सामाजिक चित्रपटांत भूमिका केल्या. वसंत पिक्चर्सचे निर्माते शरश्चंद्र गुण्ये यांनी राजा गोसावींची लोकप्रियता पाहून त्यांनाच तिहेरी भूमिकेत दाखवत ‘राजा गोसावीची गोष्ट’ सन १९५८ मध्ये प्रदर्शित केला. त्यांनी साकारलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना आवडली. सन १९६२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाप माझा ब्रह्मचारी’ चित्रपटात राजा गोसावी यांच्या सह सहकलाकार जयश्री गडकर, दामूअण्णा मालवणकर, विष्णुपंत जोग, रत्नमाला आणि इतर होते. संगीतकार वसंत देसाई. वेडा बाळ, नितीन राजहंस अशा दोन वेगवेगळ्या भूमिका यात त्यांनी सहज साकारल्या. चाकोरी बाहेरचा विषय, त्यांच्या अभिनयातील वेगवेगळ्या छटा, मुद्राभिनय यामुळे प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका आवडली.

‘काका मला वाचवा’ सन १९६६ या चित्रपटात त्यांनी विजयकुमार या चित्रकाराची भूमिका आहे. परदेशी राहणाऱ्या काकांकडून संपत्ती मिळावी, यासाठी मित्राचे ऐकून केलेला खोटेपणा, त्याचवेळी प्रामाणिक प्रियकराची भूमिका; अशी विरोधाभास असलेली त्यांची व्यक्तिरेखा होती. ‘असला नवरा नको गं बाई’ सन १९७६ या चित्रपटामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाचे इरसाल पात्र रंगविले. ‘हा खेळ सावल्यांचा’ सन १९७६ सहकलाकार आशा काळे,लालन सारंग, डॉ. काशिनाथ घाणेकर, अशोककुमार, सुमती गुप्ते जोगळेकर आणि इतर होते. यासारख्या काही चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या लक्षवेधी भूमिका केल्या. अनेक चित्रपटांत गंभीर भूमिका सहज रीत्या साकारल्या.

मराठी रंगभूमीवरही उमटवला ठसा

राजा गोसावी यांनी मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उधार उसनवार : भीमराव वाघमारे, एकच प्याला : तळीराम, करायला गेलो एक: हरिभाऊ हर्षे, कवडीचुंबक: पंपूशेट, घरोघरी हीच बोंब: दाजिबा, डार्लिंग डार्लिंग: प्रभाकर, तुझे आहे तुजपाशी: श्याम, नटसम्राट: गणपतराव बेलवलकर, पुण्यप्रभाव : नुपुर, सुदाम, कंकण, प्रेमसंन्यास: गोकुळ, भाऊबंदकी : नाना फडणीस, भावबंधन: रखवालदार, महेश्वर,कामण्णा , धुंडीराज, याला जीवन ऐसे नाव: नाथा, लग्नाची बेडी : अवधूत, गोकर्ण, संशय कल्लोळ: फाल्गुनराव, भादव्या अशा अनेक सामाजिक, विनोदी आणि कौटुंबिक नाटकात त्यांनी वेगवेगळ्या छटेच्या भूमिका केल्या. नाटकात संवाद म्हणताना ते स्वत:च्या मनाची वाक्येही त्यातून म्हणत. हा हजरजबाबीपणा त्यांच्या अनेक नाटकांतून दिसायचा.

टायमिंगचा राजा माणूस

वसंत सबनीस लिखित ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या विनोदी नाटकामध्ये राजा गोसावी यांनी ‘नाना बेरके’ हे बनेल पुरुषाचे पात्र केले होते. शेजाऱ्यांशी असलेला वाद ह्या किरकोळ विषयावरचे हे नाटक त्यांच्या हजरजबाबी विनोदी शैली, प्रभावी शब्दफेक यामुळे अविस्मरणीय झाले. स्वतःच्या ‘रंग श्री’ नाट्य संस्थे द्वारे रंगभूमीवर अनेक जुनी आणि नवीन नाटके सादर केली. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक यशस्वी प्रयोग झाले.

सन १९५० ते १९८० अशी तीन दशके राजा गोसावी यांनी त्यांच्या अभिनयानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. निरागस, बोलका चेहरा, सहज संवादफेकी द्वारे हशा मिळवण्याचे कौशल्य; ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने होती.शहरी, मध्यमवर्गीय,भाबडा, निरागस नायक त्यांनी अनेक चित्रपटात साकारला. शहरी मध्यमवर्गीयांना आपल्यातलाच कोणीतरी आहे असे वाटावे, असे साधारण रंगरूप,शरीरयष्टी त्यांची होती; नैसर्गिक अभिनय,मिश्किल विनोदी संवाद या द्वारे त्यांनी आपली चित्रपट कारकीर्द गाजवली. कारकीर्दीच्या सुरुवातीला, मध्यावर त्यांनी विनोदी अभिनेते शरद तळवलकर, ज्येष्ठ विनोदी नट, अभिनेते दामूअण्णा मालवणकर यांच्यासह उत्तमोत्तम चित्रपट आणि नाटके केली. राजा गोसावी यांनी त्यांच्या कारकीर्दीत २७५ मराठी चित्रपट,बडी माँ, गाभी, स्कूल मास्टर,महात्मा अशा पाच हिंदी चित्रपटात, सुमारे चाळीस नाटकांतून अभिनय केला.मुंबई दूरदर्शनच्या काळात मराठी मालिकात पण सहभागी होते. उदा. हसण्यासाठी जन्म आपुला. सहकलाकार विजय कदम.

Raja Gosavi Family
राजा गोसावी यांचं कौटुंबिक छायाचित्र (फोटो सौजन्य-शमा देशपांडे)

राजा गोसावी यांचा विवाह ५ जुलै १९४९ रोजी झाला. त्यांच्या पत्नी सुनंदा गोसावी. त्यांना दोन मुली, तीन मुलगे आहेत. त्यांच्या मुलांनी लहानपणी हौशी रंगभूमीवर अभिनय केलेला. त्यांच्या शर्मिष्ठा गोसावी : शमा देशपांडे या कन्या मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री आहेत. बारामतीत सन १९९५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला. नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला. राजा गोसावी यांचे पुण्यात एका नाटकाच्या वेळीच हृदयविकाराचा झटका आल्याने दिनांक २८ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ ही ‘राजा गोसावी बाल नाट्य शिबीराचे’ आयोजन दरवर्षी करते. असे अभिनय सम्राट राजा गोसावी. झाले बहु, होतील बहु, परंतु राजा गोसावी सम राजा गोसावीच.

(लेखक : श्रीप्रसाद पदमाकर मालाडकर. हे आकाशवाणी मुंबई केंद्र, ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ आणि सल्लागार आहेत.)