महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. ‘राजकारणातले राजहंस’ अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस. आजच्या या जयंतीनिमित्त त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतात. अशातच संपूर्ण देशमुख कुटुंबीयही लातूरमध्ये पोहोचले आहेत.
विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण कुटुंब लातूरमधील बाभळगावमध्ये पोहोचलं आहे आणि सर्वांनी विलासरावांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे. याचे फोटो रितेशने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रितेश, पत्नी जिनिलीया, त्याची दोन्ही मुलं, आई आणि रितेशचे दोन्ही भाऊही पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत रितेशने वडिलांविषयीच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
रितेशने हे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे, “आधी आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा असायचा; पण आता तुमच्या नातवंडांना हा खास दिवस आजोबांचा दिवस म्हणून साजरा करायचा असतो. लातूरच्या बाभळगावमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मिठीत आल्यासारखे वाटते. हृदय अजूनही त्या एका स्पर्शासाठी, त्या एका मिठीसाठी आणि त्या एका हास्यासाठी आतुर आहे. ज्यामुळे सगळं ठीक होईल. आम्हाला माहिती आहे की, तुम्ही आम्हाला पाहत आहात. तुमची आठवण येते.”
रितेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची दोन्ही मुलं रियान आणि राहिल आपल्या आजोबांच्या फोटोजवळ हात जोडून त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. दरम्यान, जिनिलीयानेही विलासराव देशमुखांना वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सासऱ्यांच्या फोटोला अभिवादन करतानाचे फोटो शेअर करत तिने “पप्पा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज आणि रोजच तुमची खूप आठवण येते.” असं म्हटलं आहे. या पोस्टखाली अनेक चाहत्यांनीही विलासरावांना अभिवादन केलं आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रितेशने स्वत:चे एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला, तरीदेखील त्याचे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रीय आहेत. रितेश अनेकदा त्यांच्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असतो. दरम्यान, रितेश लवकरच त्याचा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.