‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये सोनाली खरेने आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. सध्या सोनालीच्या ‘मायलेक’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिच्या लाडक्या लेकीसह स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सोनाली सध्या व्यग्र आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

सोनालीने वैयक्तिक आयुष्यात बिजय आनंद यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. बिजय आणि सोनाली यांची भेट ‘रात होने को है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली व पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मध्यंतरी सोनाली आणि तिच्या पतीमध्ये तब्बल २७ वर्षांचं अंतर आहे अशा चर्चा सर्वत्र चालू होत्या. परंतु, अभिनेत्रीने अनेकदा या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण देत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…”

सोनाली म्हणते, “हे नेमकं कुठून सुरू झालं मला खरंच माहिती नाही. पण, आता मी लोकांना सांगून सांगून थकलेय…आमच्यामध्ये २७ वर्षांचं अंतर अजिबात नाही. माझा जन्म आहे ५ डिसेंबर १९७८ आणि माझ्या नवऱ्याचा जन्म आहे १९७० सालचा. आता मी आमच्या जन्मतारखा खूप उघडपणे सगळीकडे सांगते. खरंतर बायका त्यांचं वय असं उघडपणे सांगत नाहीत. पण, मी सांगतेय आमच्यात फक्त ८ वर्षांचं अंतर आहे.”

हेही वाचा : अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”

“८ वर्षांचं अंतर असण्यात कुठेही काही वावगं नाहीये. जरी आमच्यात यापेक्षा जास्त अंतर असतं, किंवा ज्या जोडप्यांमध्ये जास्त अंतर आहे ते काही चुकीचं नाही. कारण, जर दोन व्यक्तींना एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्यांची साथ योग्य वाटत असेल, तर त्याच्यासमोर जात-पात, वय अशा काहीच गोष्टी नसतात. त्यामुळे मध्ये जे काही सगळीकडे येत होतं ते खोटं आहे आमच्यात फक्त आठ वर्षांचं अंतर आहे.” असं सोनाली खरेने स्पष्ट केलं.