‘सावरखेड एक गाव’, ‘चेकमेट’ अशा अनेक चित्रपटांमधून अभिनेत्री सोनाली खरे घराघरांत लोकप्रिय झाली. मराठी कलाविश्वात तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय क्षेत्रात जम बसल्यावर वैयक्तिक आयुष्यात सोनालीने बॉलीवूड अभिनेते बिजय आनंद यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. आता लवकरच सोनाली तिच्या लेकीबरोबर मोठ्या पडद्यावर ‘मायलेक’ चित्रपटाच्या माध्यमातून झळकणार आहे.

सोनाली खरे मूळची मराठी कुटुंबातील आहे. तर, बिजय आनंद हे पंजाबी आहेत. लग्न झाल्यावर या मराठी अभिनेत्रीने पंजाबी कुटुंबाशी कसं जुळवून घेतलं याबद्दल सोनालीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “याची ( बिजय आनंद ) बहीण म्हणजे योगिता…ती एवढं अप्रतिम जेवण बनवते की, मी नेहमीच तिच्या हातचं जेवण जेवण्यासाठी उत्सुक असते. आमच्या घरी महाराष्ट्रीय किंवा पंजाबी पद्धतीचं जेवण बनवत नाही. माझ्या नवऱ्याचं सगळं हेल्दी फूड खाणं असतं.”

हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी वानखेडेवर पोहोचली देशमुखांची सून! जिनिलीयाने दोन्ही मुलांसह शेअर केले खास फोटो

सोनाली पुढे लग्नाबद्दल सांगताना म्हणाली, “आमचं लग्न फार सुटसुटीत झालं. आम्हाला दोघांनाही असं फार मोठ्या पद्धतीने लग्न करायचं नव्हतं. पण, घरचं पहिलं कार्य असल्याने आणि मी एकुलती एक मुलगी असल्याने माझ्या आईचं होतं की, निदान एक रिसेप्शन करूया. त्यामुळे आम्ही रजिस्टर मॅरेज करून नंतर जवळच्या माणसांसाठी डोंबिवलीमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती.”

“हा (बिजय आनंद ) खूप प्रॅक्टिकल माणूस आहे. त्यामुळे आम्ही लग्न, रिसेप्शन करून थेट फिरायला गेलो. अर्थात पंजाबी रिती-रिवाजांप्रमाणे आम्ही सासूला गोड देणं, गिफ्ट्स देणं या सगळ्या गोष्टी केल्या. मूळ पंजाबी परंपरा मी बिजयच्या बहिणीच्या लग्नामध्ये शिकले. सासूपर्यंत पाण्याची घागर घेऊन जातात, मग सासू तुम्हाला पैसे देते. या सगळ्या गोड गोष्टी मी केल्या आहेत. याशिवाय गुरुनानक जयंतीला आमच्या इथे कणकेच्या पिठाचा कडा हा पदार्थ करतात. जो मला प्रचंड आवडतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूला माझ्या हातचा कडा सगळ्यात जास्त आवडतो. याचा मला विशेष आनंद आहे.” असं सोनाली खरेने सांगितलं.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार स्पृहा जोशीची ‘सुख कळले’ मालिका! ‘रमा माधव’च्या वेळेत केला ‘असा’ बदल, जाणून घ्या…

बिजय आणि सोनाली यांची भेट ‘रात होने को है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली व पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एकमेकांना काही वर्षे डेट करून सोनाली व बिजय यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या जोडप्याला सनाया नावाची गोड मुलगी असून ‘मायलेक’ चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.