Zapuk Zupuk Box Office Collection Day 6: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता रीलस्टार सूरज चव्हाणने अभिनेता म्हणून पदार्पण केलं आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘झापुक झुपूक’ प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहे. सहा दिवसांत ‘झापुक झुपूक’ चित्रपटाने किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊयात.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. सूरजला मुख्य भूमिकेत घेऊन त्यांनी हा चित्रपट तयार केला. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये त्यांनी ‘झापुक झुपूक‘ची घोषणा केली आणि अवघ्या सहा महिन्यांत हा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरला चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं, मात्र चित्रपटाबद्दल लोकांमध्ये फारशी क्रेझ दिसून आली नाही.

‘झापुक झुपूक’ची आकडेवारी पाहिल्यास ५ दिवसांनी तो एक कोटी रुपयांची कमाई करण्यात यशस्वी ठरला. सहाव्या दिवशी तर या चित्रपटाने १० लाखांपेक्षाही कमी कलेक्शन केले आहे. दमदार कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? आकडेवारी नजर टाकुयात.

‘झापुक झुपूक’ ६ दिवसांचे कलेक्शन

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने पहिल्या दिवशी २४ लाख, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही २४ लाख कमावले. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने १९ लाख, चौथ्या दिवशी या चित्रपटाने १४ लाखांचा गल्ला जमवला. ‘झापुक झुपूक’ने पाचव्या दिवशी १७ लाख रुपये कमावले. पण सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘झापुक झुपूक’ने सहाव्या दिवशी ९ लाख रुपये कमावले. आता या चित्रपटाचे वर्ल्ड वाइड एकूण कलेक्शन १.१९ कोटी रुपये झाले आहे.

‘झापुक झुपूक’ ला प्रेक्षक मिळेना

‘झापुक झुपूक’च्या तिकिटांचे दर मंगळवारी घटवण्यात आले होते. फक्त ९९ रुपयांमध्ये तिकिटांची विक्री करण्यात आली. ही खास ऑफर फक्त एका दिवसासाठी होती. दरम्यान, सूरजने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. तसेच चित्रपटाबद्दल नकारात्मकता पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला. अनेक ठिकाणी ‘झापुक झुपूक’ला प्रेक्षक मिळत नसल्याचं चित्र दिसतंय. थिएटर रिकामे असल्याचे फोटो व व्हिडीओही व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘झापुक झुपूक’ मधील कलाकार

‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरजसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहेत.