प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. त्यातच दरवर्षी अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पाचं आगमन होत असतं. यात मात्र मराठी चित्रपट दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याकडे खास दरवर्षी चांदीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.

“आम्ही पूर्वीपासूनच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आलो आहोत. शाडूची मूर्ती आणून तिचं घरी विसर्जन करणं हा प्रकार फारसा न पटल्याने आम्ही चांदीची मूर्ती तयार केली आहे. दरवर्षी तिचीच प्रतिष्ठापना करतो. आरास आणि सजावटीसाठी नैसर्गिक गोष्टी वापरण्याकडे माझा कल असतो. एकच मखर वापरल्याने अनावश्यक कचरा होत नाही. यंदा माझे आईवडील अमेरिकेत भावाकडे गेल्याने ते तिकडेच गणपती बसवणार आहेत. त्यामुळे आमच्या गणपतीचं ऑनलाइन दर्शन घेईन. यावर्षी मी गणेशोत्सवासाठी डोंबिवलीत सासुरवाडीला जाणार आहे. या दिवसांत पुण्यातील गणेशोत्सवाचं वातावरण, तिथली मजा या गोष्टींची आठवण येईल. तिथे रात्री मित्रांबरोबर मानाचे गणपती पाहणं हा एक कौटुंबिक सोहळाच असतो. पुण्यात ढोल-ताशा पथकांना वेगळाच मान आहे. तरुण आपले नोकरी व्यवसाय सांभाळत आवडीने ढोल-ताशा पथकात सहभागी होतात. ऑगस्ट महिना जवळ आला की पुण्यात ढोल-ताशाचे स्वर हमखास कानी पडू लागतात”,

“गणपतीचं आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वोत्कृष्ट वादन कोण करतं यासाठी ढोल-ताशा पथकांत नेहमीच चढाओढ असते. करोनामुळे परंपरागत गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं आहे. गणेशोत्सव मंडळांनी घेतलेले निर्णय योग्यच वाटतात. अनेक गणेशोत्सव मंडळं रक्तदान शिबिरांचं आयोजन; मुखपट्टय़ा, हातमोजे, सॅनिटायझरचं वाटप असे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. घरीच राहून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मी प्रेक्षकांना करतो”.

सौजन्य : लोकप्रभा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director nipun dharmadhikari on ganesh chaturthi ssj
First published on: 22-08-2020 at 16:30 IST