मराठी मनोरंजन क्षेत्रातील पहिली खाजगी वाहिनी म्हणून ‘झी मराठी’कडे पाहिले जाते. आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका या वाहिनीने सादर केल्या आहेत. अर्थात त्यामुळे त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत सुरू झालेल्या किंवा नुकत्याच संपलेल्या मालिका पाहिल्या तर या ‘झी मराठी’वरच्याच मालिका आहेत का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल यात शंका नाही. मालिका चालवायच्या, त्यात पाणी घालायचे आणि त्याचा शेवट गुंडाळायचा, असे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. लेखन, सारासार विचार याबाबतीतही आचरटपणाचा कळस झालेला दिसतोय..

मालिकांच्या आकर्षक जाहिराती करून प्रेक्षकांवर त्याचा मारा करायचा, मालिकेबाबत उत्सुकता निर्माण करायची, त्यात भरमसाट पाणी घालत प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत त्या खेचत न्यायच्या, किमान विचार न करता.. आले  लेखक, निर्माता, वाहिनीच्या मना.. म्हणून अनाकलनीय पद्धतीने त्या मालिका गुंडाळून टाकायच्या असे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर चालले आहे. मालिका पाहणारा प्रेक्षक हा सुमार दर्जाचा किंवा निर्बुद्ध आहे, त्याला आपण काहीही दिले तरी चालेल, अशा पद्धतीने मालिकांतील सादरीकरण व लेखन होत चालले आहे. कितीही नाकारले आणि दूरदर्शन संचाचा ‘रिमोट’ हा प्रेक्षकांच्या हातात असला तरीही केवळ ‘झी मराठी’च नाही तर अन्य दूरचित्रवाहिन्यांवरील या मालिकांना खूप मोठा प्रेक्षकवर्ग मिळालेला आहे हे विसरून चालणार नाही.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील पहिली आणि प्रस्थापित झालेली खाजगी वाहिनी म्हणून ‘झी मराठी’कडे पाहिले जाते. आजपर्यंत अनेक दर्जेदार मालिका या वाहिनीने सादर केल्या आहेत. आजही अन्य वाहिन्यांच्या तुलनेत प्रत्येक घराघरात ‘झी मराठी’ वाहिनीवरच्याच मालिका पाहिल्या जातात. अन्य वाहिन्यांवरील मालिका दुसऱ्या दिवशी ‘रिपीट’ म्हणून प्रेक्षक पाहतात. याचा अर्थ आपण जे देऊ ते प्रेक्षकांनी निमूटपणे पाहावे असा होत नाही. ललित किंवा वैचारिक साहित्य वाचणारे, त्यावर चर्चा करणारे बुद्धिमान आणि मालिकांचा प्रेक्षक वर्ग ‘सुमार’ किंवा ‘निर्बुद्ध’ असा एक समज आहे. कोणी सांगितलेय तुम्हाला मालिका पाहायला, पाहू नका. तो ‘रिमोट’ तुमच्या हातात आहे.. बंद करा, अशा सूचनाही दिल्या जात असतात. ते खरे असले तरीही त्याचा अर्थ मालिका पाहणारे सर्वच जण निर्बुद्ध आहेत असे नाही आणि मालिकेच्या नावावर वाहिनी, निर्माता आणि लेखकांनी काहीही खपवावे, असाही होत नाही.

‘झी मराठी’वर काही महिन्यांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सादर झाली होती. सुरुवातीला मालिकेतून अंधश्रद्धा पसरविली जात आहे ते कोकणातील पर्यटन कमी होईल, अशी टीका त्यावर केली गेली. ती ओसरल्यावर काहीतरी वेगळे पाहायला मिळेल असे वाटत असतानाच शेवटच्या काही भागांत ही मालिका अक्षरश: गुंडाळली गेली. मालिकेतील ‘नीलिमा’ हे पात्र हो, हे खून मीच केले आहेत, असे सांगते आणि मालिकेचा ‘दी एन्ड’ होतो. प्रेक्षकही अवाक झाले. ‘नीलिमा’ ते खून कसे करते, ‘विश्वासराव’ त्याचा शोध कसा घेतो, ते उलगडून दाखविणे अधिक चांगल्या प्रकारे करता आले असते. पण त्या मालिकेतही शेवटपर्यंत घोळवत घोळवत ठेवून शेवटच्या एक-दोन भागांत सगळे ‘कोडे’ कसे सुटले आणि किती कौशल्यपूर्ण ‘तपास’ केला त्याचा आव आणलेला दाखविला गेला. आपल्याला ‘मूर्ख’बनवले गेले असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आणि ती खोटी नव्हती. समाजमाध्यमांवरून प्रतिक्रियांच्या स्वरूपात त्याचे पडसाद उमटले. रात्री साडेदहाच्या वेळेचा आणि मालिका ताणत ताणत नेऊन शेवटच्या एक किंवा दोन भागांत ती गुंडाळून टाकण्याचा ‘पायंडा’ बहुधा ‘झी मराठी’ने सुरू केला आहे. कारण नुकतीच संपलेली ‘हंड्रेड डेज’ ही मालिकाही त्याचेच उदाहरण आहे.

मालिकेच्या पहिल्याच भागात ‘राणी’ने ‘धनंजय’चा खून केल्याचे कळल्यामुळे त्यात ‘रहस्य’ असे काहीच राहिलेले नव्हते. पण त्यानंतर ‘राणी’ जे काही खून करते ते कसे करते, त्याचा तपास करण्याकरिता ‘अजय ठाकूर’ व त्यांचा चमू नेमके काय करतो ते दाखवायला हवे होते. ‘धनंजय’ला शेवटचे पाहणारा ‘राणी’चा चालक ‘तिवारी’ यालाही पहिल्यांदाच ‘पोलिसी खाक्या’ दाखविला असता तर तेव्हाच ही ‘केस’ उलगडली गेली असती. मालिकेत ‘तावडे’ (अनंत जोग) इन्स्पेक्टरचा झालेला प्रवेश मालिकेला वेगळे वळण देणारा ठरेल असे वाटत होते. ‘वेडय़ाचे सोंग घेऊन पेडगावला’ जाणाऱ्या त्या इन्स्पेक्टरने ‘राणी’च्या सभ्यपणाचा बुरखा कसा फाडला आणि तिच्या विरोधात सर्व पुरावे कसे गोळा केले हे खूप चांगल्या प्रकारे दाखविता आले असते. पण तेथेही निराशा झाली. ‘अजय ठाकूर’ ‘राणी’चे आई-वडील, तिचा पहिला नवरा आणि तिच्या एकूणच पूर्वायुष्याबाबत जो तपास अगदी ‘वेगाने’ शेवटच्या दोन/चार भागांत करताना दाखविला तो अगोदरच्या काही भागापासून करतोय असे दाखविता आले असते. प्रेक्षकांना उत्कंठा होती ती पोलिसी तपासाची. पण छे.. तो तपास शेवटपर्यंत दिसलाच नाही.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही सध्या सुरू असलेली मालिकाही अशीच. मालिकेतून लेखक, निर्माता आणि वाहिनीला नेमके काय सांगायचे आहे? आपला नवरा आपल्यावर प्रेम करतच नाही पण नवरा आणि वडील म्हणूनही त्याचे कर्तव्यही बजावत नाही. लग्नाची बायको, लहान मुलगा असतानाही आपल्या हक्काच्या घरात दुसऱ्या मुलीबरोबर राहतोय. पैशांची व जागेची अडचणही एकवेळ दुय्यम समजली तरी जिथे आपल्याबद्दल नवऱ्याच्या मनातच तिरस्कार आहे, स्वत:चे आई व वडील, मित्र यांनाही तो जुमानत नाही आणि एका मुलीच्या प्रेमात पडून तो आंधळा झाला आहे अशा माणसाला ‘मी माझ्या संसारात परत आणून दाखवेन’ या अट्टहासाला काय म्हणायचे? स्वत:चा झालेला अपमानही ‘ती’ बाई विसरते की तो तिला जाणवतच नाही. कार्यालयात झालेला अपमान तिच्या जिव्हारी  लागलाय असे वाटत असतानाच पुढच्याच भागात ती ‘शनया’शी ड्रेसची अदलाबदल करून आपण कसे लहान मुलांसारखे गंमत गंमत करतोय हे दाखवून देते. खरे तर अशा प्रसंगी एखादी बाई खमकेपणा दाखवून, कायदा, स्त्री हक्क संघटना यांची मदत घेऊन नवऱ्याला कशा प्रकारे वठणीवर आणते ते सादर करायला हवे होते. पण ‘मी माझ्या नवऱ्याला परत मिळवेनच’ (तो कसाही चुकीचा वागत असला तरी) असे दाखवून मालिकेला कोणता संदेश द्यायचा आहे ते कळत नाही.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तर सगळी गंमतच आहे. एकदा का घटस्फोट द्यायचा ठरविल्यानंतर घरातल्यांना न सांगण्यासारखे काय आहे?  ‘विक्रांत’ला जर ‘सज्जनाचा पुतळा’च दाखवायचे असेल तर झालेल्या ‘बाळा’चे वडील शोधून काढून ‘मोनिका’ व ज्याच्यापासून ते मूल झाले आहे त्याचे लग्न लावून देऊन त्या बाळाच्या भल्याचा विचार तो का करत नाही? स्वत:च गुन्हा केल्याप्रमाणे त्याला ‘अपराधी’ दाखविण्याचे काय कारण?

‘चुक भूल’ आणि ‘नकटीच्या लग्नाला’ या दोन्ही नव्याने सुरू झालेल्या मालिकाही अशाच चित्रविचित्र संकल्पनांवरच्या आहेत. १०३ वर्षांची वृद्ध आई अजूनही २० हजार रुपयांच्या साडय़ा घ्यायला लावतेय.. मुळात ते पात्र १०३ वर्षांचे वाटत नाही.

‘लग्न’ या गोष्टीकडे इतक्या वरवर पाहणारी मुलगी असू शकते? पण तिच्या पालकांना ‘टॉवर’ मिळणार आहे म्हणून ते आपल्या पोटच्या पोरीचे लग्न कोणत्याही प्रकारच्या मुलाला बळेच जावई करून घेण्यासाठी इतके अधीर होतील?

असो. अजूनही अशा अनेक आचरटपणाच्या गोष्टी सांगता येतील. केवळ ‘झी मराठी’च नव्हे तर इतरही वाहिन्यांवर मालिकांच्या बाबतीत थोडय़ाफार प्रमाणावर हाच आचरटपणा दिसून येतो. एकंदरीत सध्या वाहिन्यांकडे चांगल्या लेखकांचा किंवा कल्पनांचा दुष्काळ आहे असे वाटते किंवा आपण काहीही दिले तरी प्रेक्षक ते पाहाताहेत ना? मग द्या त्यांना काहीही, असा विचार बहुधा ते करत असावेत.

जाता जाता- ‘दिल दोस्ती दोबारा’ ही नवी मालिका ‘झी मराठी’वर सुरू झाली आहे. ही मालिका तरी प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणार नाही, अशी आशा बाळगू या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेखर जोशी shekhar.joshi@expressindia.com