मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत उमदा, तरुण दिग्दर्शक निशिकांत कामत. खूप कमी वयात हिंदीतही लौकिक मिळवणाऱ्या या संवेदनशील, प्रगल्भ दिग्दर्शकाचे करोना काळात २०२० मध्ये निधन झाले. त्याचं असं अचानक निघून जाणं त्याच्याबरोबर असलेल्या न पेक्षा त्याने प्रेमाने कमावलेल्या अनेकांना चटका लावून गेलं, अस्वस्थ करून गेलं. त्याच्या जाण्याने मनात निर्माण झालेली अस्वस्था, त्याच्या आठवणी, विचारांचा गुंता हे सगळं शोधताना जे काही सापडत गेलं ते जोडत, काही नव्याने मांडत अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक प्राजक्त देशमुख या सर्जनशील मंडळींनी ‘गोदावरी’ ही कलाकृती निर्माण केली. या चित्रपटाची प्रक्रिया, लेखनापलीकडे जात त्यातला भाव उमगून काम करणारी संजय मोने, नीना कुलकर्णी आणि गौरी नलावडे ही कलाकार मंडळी.. या सगळय़ांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला दिलेल्या भेटीत ही प्रक्रिया उलगडून सांगितली.

एखाद्याच्या व्यक्तित्वाचा वेध घेत चित्रपट करताना अनेकदा त्यातून काय सांगायचं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं आणि तेच ‘गोदावरी’ चित्रपटाच्या बाबतीत घडलं, असं दिग्दर्शक निखिल महाजन यांनी सांगितलं. ‘गोदावरी’च्या लेखनापासून कोणतीही प्रक्रिया लोकांना काय आवडेल या विचाराने केलेली नाही. निशिकांत कामत गेल्यानंतर खरोखरच एक अस्वस्थता सगळय़ांच्याच मनात होती. पण माझ्यापेक्षा ती जितेंद्रच्या मनात जास्त होती, कारण तो त्याच्या जवळ होता. आणि जितेंद्र मला जवळचा असल्याने त्याची अस्वस्थता साहजिकच मला अस्वस्थ करत होती. त्यातून निशिकांतच्या आठवणी, विचार या सगळय़ातून आम्ही जे शोधत गेलो, करत गेलो आणि हा चित्रपट साकार झाला. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन ही कोणतीच प्रक्रिया ठरावीक हेतून केलेली नव्हती. निशिकांतसाठी चित्रपट करायचा होता. त्यांच्यासाठी तो केला, असं निखिल यांनी सांगितलं.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

मारुतीच्या पायाला पाणी लागलं का..या चित्रपचटाच्या प्रोमोमध्ये एक संवाद अभिनेते विक्रम गोखले आणि नंतर जितेंद्र जोशी यांच्या तोंडी पाहायला मिळतो तो म्हणजे, ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं का..’. मुळात ‘गोदावरी’ हा भावभावना व्यक्त करत बोलणारा असा चित्रपट आहे. त्यामुळे या संवादाचा आगापिछा नसतानाही तो लोकांना विचारासाठी उद्युक्त करतो आहे याचा आनंद असल्याची भावना निखिल महाजन यांनी व्यक्त केली. तर या संवादामागची भूमिका सविस्तरपणे समजावून देताना लेखक म्हणून आपण घेतलेली भूमिका काय होती हे प्राजक्त देशमुख यांनी सांगितलं. ‘जिथे गावं आहेत, नद्या आहेत तिथे तिथे मारुतीचं एक मंदिर असतं. या नद्यांना जर पूर आला तर कुठवर पाणी आलं याचं मापन करण्यासाठी खरंतर मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?, हा प्रश्न विचारला जातो. पण मुळात तो फक्त पाणी मोजण्यासाठीचा प्रश्न नाही, तर त्या प्रश्नाला संपूर्ण गावाची काळजी चिकटलेली असते. अर्थात, चित्रपटात ती व्यक्तिरेखा का आणि कुठल्या अर्थाने हे विचारते आहे ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल’, असं प्राजक्त यांनी सांगितलं.

ही त्या ऊर्जेची गोष्ट आहे..

‘गोदावरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माता म्हणून जितेंद्र जोशी यांनी पदार्पण केलं आहे. निशिकांतसारख्या जिवलग मित्राच्या जाण्याने आलेली अस्वस्थता आणि त्यातून चित्रपट का करावासा वाटला?, याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपले विचार मांडले. ‘एखादा माणूस गेल्यानंतर तुम्ही त्याला नीट जाऊही देत नाही. आता तो गेला.. आता त्याच्याविषयी बोलून काय करता? तुमचे लाइक्स-डिसलाइक्स, तुमचे ट्विटर, रील्स.. इतके उच्छृंखल झालात का? की एखाद्याविषयी काहीही बोलत राहाल..’, अशा शब्दांत जितेंद्रने एकूणच समाजमाध्यमांवर उथळपणे कोणाविषयी केल्या जाणाऱ्या मतमतांतराविषयी खंत व्यक्त केली.

‘मी आज जो काही नट आहे तो आजवर ज्यांच्या ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी मला जे जे दिलं त्यातून घडत गेलो आहे. माझ्यातून ही माणसं काढता कशी येतील? ती असतात तुमच्या आत.. तसा निशी माझ्या आत आहे. आणि तो फक्त माझा नाही. प्राजक्तने त्याचा त्याचा निशी आणला, त्याचं कुटुंब या कथेत आणलं. लेखक लिहीत असतो काही माहीत असलेलं, काही माहिती नसलेलं.. नट ते साकारत असतो त्याला माहिती असलेलं, माहिती नसलेलं.. या सगळय़ा प्रक्रियेतून ती कलाकृती घडत जाते. काही व्यक्ती भौतिक अर्थाने आपल्यातून निघून जातात, पण त्यांची ऊर्जा, त्यांचं असं काहीतरी आपल्याकडे उरलेलं असतं. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उतरतं. तशी ही निशिकांतकडून मिळालेल्या ऊर्जेची गोष्ट आहे’, असे तो म्हणतो.

भागिरथीसारख्या अनेक स्त्रिया आजूबाजूला आहेत

एखाद्याशी सूर जुळला की मी आपोआपच होकार देते. ‘गोदावरी’ हा असा पहिला चित्रपट आहे जो मी कोरी पाटी घेऊन केला आहे. मी फक्त दिग्दर्शक म्हणून निखिल काय सांगतो आहे हे ऐकत होते. या चित्रपटातील भागिरथीसारख्या सोशिक, समंजस, परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि तरीही सर्व कुटुंबाला बांधून ठेवण्याची क्षमता असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. भूमिकेसाठी आम्हाला तयारीला फार वेळ नव्हता. करोना सगळीकडे बोकाळलेला असल्याने घाबरत घाबरत एकदा पटकथा वाचनासाठी एकत्र आलो आणि नंतर थेट चित्रीकरण. जिथे चित्रीकरण होणार होतं ती जागाही सुंदर होती. समोरच वाहणारी गोदावरी, म्हटलं तर काहीच आकार नसलेलं आणि ज्यात बरंच काही आहे असं घर, तिथली रचना या सगळय़ातून ती भूमिका साकारत गेली.

नदी सोडत नाही.. – संजय मोने

जितेंद्रने मला चित्रपटाविषयी विचारलं आणि मी होकार दिला. चित्रपटाला मूलत: एक कथानक लागतं आणि भारतीय समाज हा भावनांवर चालतो. त्यामुळे कथेत भावभावना असाव्या लागतात. मात्र या भावनांचं कुठेही कथेच्या लेखनातही अवडंबर माजवेललं नव्हतं. एखादी घटना घडल्यानंतर घरातल्या व्यक्ती जशा प्रतिक्रिया देतील तशाचप्रकारे या चित्रपटातील व्यक्तिरेखा व्यक्त होतात. उगाचच कलात्मकता वगैरे असं काही नाही त्यात..

दुसरी एक गोष्ट मला या चित्रपटाच्या बाबतीत जाणवली ती म्हणजे मुंबई – पुण्यासारख्या मोठमोठय़ा शहरांमध्ये ज्या विचित्र गुंतागुंतीच्या भावभावना निर्माण झाल्या आहेत त्या छोटय़ा छोटय़ा शहरांमध्ये झिरपत चालल्या आहेत आणि हा धोका आहे. एक मुंबई महाराष्ट्रात शोभून दिसते, अशा ५० मुंबई झाल्या तर वैविध्यतेतील गंमतच उरणार नाही. आम्ही जिथे चित्रीकरण करत होतो तिथे आजूबाजूच्यांना विचारलं, गोदावरी नदीला नेहमी पूर येतो. तरीही तुम्ही इथे का राहता? नाशिक एवढं मोठं झालं आहे.. तुम्ही हा परिसर सोडून का जात नाही? तुमच्या इतक्या वर्षांचा व्यवसाय आहे की तुम्ही दुसरीकडे गेलात तरी तुमचं चांगलं चालू शकतो. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून काटा आला माझ्या अंगावर.. ते म्हणाले, नदी सोडत नाही. नदी सोडत नाही म्हणजे काय? हे हळूहळू माझ्या लक्षात आलं. तसा हा चित्रपट तुम्हाला सोडत नाही.

हे कलाकार माणूस म्हणून थोर आहेत.. – गौरी नलावडे

खरंतर पहिल्याच चित्रपटात इतक्या मोठय़ा कलाकारांबरोबर काम करायचं म्हटल्यावर मला दडपण आलं होतं. पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. या सगळय़ांबरोबर काम करण्याचा कमाल अनुभव होता. मी सगळय़ांचं निरीक्षण करत होते शांतपणे.. आणि या सगळय़ांचं काम बघताना माझ्या लक्षात आलं की हे कलाकार उगाचच मोठे झालेले नाहीत. ते माणूस म्हणूनही तितकेच थोर आहेत. विक्रम गोखले असू देत वा नीना ताई, संजय मोने हे सगळे प्रत्येक दृश्य दिल्यानंतर निखिलकडे एखाद्या लहान मुलासारखं बघायचे की सगळं नीट झालं आहे ना.. आणि त्याचंही असं व्हायचं की अरे तुम्ही सगळे चांगलंच करत आहात. तेव्हा मला हे जाणवलं की आज हे कलाकार जिथे आहेत तिथे ते का आहेत.