आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर – अग्रवाल हिचादेखील समावेश होतो. हिंदीचा छोटा आणि मोठ्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रीना आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चांगल्या भूमिका वठवत आहे. रीनाची खासियत म्हणजे, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात तिने अभिनयाचा वेल बॅलेंस साधला आहे. ‘अजिंठा’ या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रीनाने हिंदी सिनेसृष्टीतला आपला करिअरचा ग्राफ चढता उंचावला आहेच, पण त्यासोबतच ती मराठी सिनेसृष्टीलादेखील तेवढेच प्राधान्य दिले आहे. सध्या रीना ‘एजंट राघव’ या मालिकेत डॉ. आरती मेस्त्रीची भूमिका साकारीत आहे. रीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. रीनाचे व्यक्तिमत्व देखील असेच डॅशिंग असल्यामुळे तिने साकारलेल्या इन्स्पेक्टर सविताच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. अशाप्रकारे मराठीतील ‘अजिंठा’ आणि हिंदीतील ‘तलाश’ या दोन महत्वाच्या सिनेमांमुळे तिच्या करिअरचा आलेख चांगलाच वाढला. अभिनेत्री म्हणून करिअर करण्यापूर्वी रीनाने एका खाजगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम केले होते. आपण पुढे जाऊन अभिनेत्री बनू असा स्वप्नातही विचार न केलेल्या रीनाला तिच्या नृत्यकलेने अभिनय क्षेत्रात आणले. दिसायला सुंदर असणा-या रीनाचे हे नृत्यकौशल्य नितीन देसाई यांनी उत्तमरित्या हेरले. त्यांच्या ‘अजिंठा’ या सिनेमातील ‘कमला’ या सेकंड लीड भूमिकेसाठी रीनाची निवड करण्यात आली. रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’ या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबत काम केले आहे. सध्या रीना ‘एजंट राघव’ या मालिकेसोबतच अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ”कृष्णप्रिया’ या संगीतनाटकात ‘उदा बाई’ आणि ‘राधा’ ची भूमिका करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2015 रोजी प्रकाशित
रीना वळसंगकर हिंदी मालिकेतला मराठमोळा चेहरा
अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 14-12-2015 at 13:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi girl reena valsangkar in hindi television