प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ नाटकावर आधारित याच नावाचा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे आहे. चित्रपटात स्वत: महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ध्यानीमनी’च्या चमूने गुरुवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांबरोबर संवाद साधला. महेश मांजरेकर, अश्विनी भावे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी व प्रशांत दळवी हे या वेळी उपस्थित होते. त्या गप्पांचा वृत्तान्त..
‘भारतीय समाज व मानसिकतेशी निगडित विषय’
‘ध्यानीमनी’ नाटकाचा विषय हा भारतीय समाज आणि मानसिकतेशी निगडित असून काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. नाटकावर आधारित काही चित्रपट याअगोदरही सादर झाले आहेत. जगातील बरेच उत्तम चित्रपट हे नाटकावर आधारितच आहेत. अर्थात प्रत्येक नाटकावरून चित्रपट आणि प्रत्येक चित्रपटावरून नाटक होऊ शकणार नाही. ‘ध्यानीमनी’ नाटकात तो होता आणि आहे. नाटकाचा विषय हा भारतीय समाज व मानसिकतेशी निगडित आहे. आज इतक्या वर्षांनंतरही तो विषय कालबाह्य़ ठरत नाही आणि मुख्य म्हणजे अजूनही ते नाटक प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एक तीव्र व सुन्न करणारा अनुभव तेव्हा या नाटकाने प्रेक्षकांना दिला. ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट तोच अनुभव प्रेक्षकांना देईल. हा चित्रपट ‘सायकोलॉजिकल थ्रिलर’ असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळेल. महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे या दोघांनीही चित्रपटात उत्कृष्ट काम केले असून त्या दोघांनी आजवर ज्या भूमिका केल्या त्यापेक्षा वेगळ्या भूमिकेत ते दोघेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-चंद्रकांत कुलकर्णी
‘ध्यानीमनी’ची निर्मिती आमच्यासाठी अभिमानास्पद’
‘ध्यानीमनी’ हा चित्रपट आमच्या निर्मिती संस्थेने केला ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. ‘बॉक्स ऑफिस’वर हा चित्रपट चालेल की नाही याचा विचार न करता चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक चांगला चित्रपट प्रेक्षकांना आम्ही सादर केला आहे. ‘ध्यानीमनी’ नाटकाशी निर्माता, कलाकार म्हणून मी संबंधित होतो. नाटकातील भूमिकांचे मानसशास्त्र मला ठाऊक होते. ‘ध्यानीमनी’वर चित्रपट व्हावा असे अनेकांनी सांगितले होते. त्यामुळे तो आमच्या निर्मितीसंस्थेतर्फे तयार करावा असे ठरविले. माझ्यातील अभिनेता म्हणूनही या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका करायला मिळाली. मी कधीच ‘मेथड अॅक्टर’ नव्हतो. भूमिकेत शिरून काम करणे वगैरे मला जमत नाही. कॅमेऱ्यासमोर आलो की त्या भूमिकेत आणि क ट् म्हटले की त्यातून बाहेर, अशा पद्धतीने मी काम करतो. मला स्वत:ला दिग्दर्शक म्हणून ‘शेक्सपिअर’च्या नाटकावर तसेच ‘रामायण’ किंवा ‘महाभारत’ यावरही चित्रपट करायचा विचार आहे. गेल्या काही वर्षांत मराठीत भरमसाट चित्रपट प्रदर्शित होत असून त्याचा फटका मराठी चित्रपटांना बसला आहे. वर्षांला सुमारे ३५ ते ४० चित्रपटच तयार होऊन प्रदर्शित व्हावेत असे वाटते.
-महेश मांजरेकर
‘ध्यानीमनी’चा ‘सिनेमॅटिक’ अनुभव
‘लोकसत्ता’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळात १९९१ च्या सुमारास ‘चारचौघी’ आणि १९९३ मध्ये ‘ध्यानीमनी’ ही नाटके मी लिहिली. ‘ध्यानीमनी’ हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेले. आत्ताच्या पिढीला हे नाटक माहिती नाही. हे नाटक पाहताना तेव्हा ‘सिनेमॅटिक’अनुभव आला होता. काही विषय हे दीर्घकाळ टिकणारे असतात. ‘ध्यानीमनी’ नाटकाचा विषयही तसाच आहे. नाटकात विषय मांडताना नाटकाच्या म्हणून काही मर्यादा येतात. चित्रपटाच्या माध्यमातून असा विषय अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतो. ‘ध्यानीमनी’ हे नाटक हिंदीत ‘बस यही ख्वाब है’ या नावाने सादर झाले होते. माणूसपण शोधणे हा माझ्या आवडीचा विषय आहे. मानवी स्वभाव, अपेक्षा आणि आकांक्षा या कधीही जुन्या न होणाऱ्या गोष्टी आहेत. मी मानसशास्त्र विषय घेऊन ‘बीए’ झालो. त्यामुळे या विषयात रुची होती. व्यावसायिक नाटक लिहिण्यापूर्वी मी ‘पौगंड’ हे नाटक लिहिले होते. ‘ध्यानीमनी’ नाटकातील ‘सदानंद’ व ‘शालू’ या भूमिका लिहिताना मला त्याचा उपयोग झाला. ‘ध्यानीमनी’ नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर ते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना वाचायला दिले होते.
प्रशांत दळवी, नाटककार
‘वेगळी भूमिका करायला मिळाली’
‘ध्यानीमनी’ या नाटकाशी मी कधीच संबंधित नव्हते. इतकेच नव्हे तर शिवाजी साटम व नीना कुलकर्णी यांचे ‘ध्यानीमनी’ नाटकही मी पाहिलेले नाही. या नाटकाचा हिंदी प्रयोग मात्र पाहिला होता. नाटक माहिती नसले तरी नाटकातील ‘आई’ची भूमिका मी प्रत्यक्ष जगले व जगत आहे. चित्रपटातील माझी भूमिका ‘आई’पणाची उकल करणारी आहे. नाटकाचा विषय हा वैश्विक असून चित्रपटासाठीही तो तसाच आहे. अशा विषयावरचे चित्रपट, नाटक सादर होणे आवश्यक आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका ‘ध्यानीमनी’ चित्रपटाच्या निमित्ताने मला करायला मिळाली. मात्र या भूमिकेसाठी तयारी करायला मला फार कमी वेळ मिळाला. या भूमिकेसाठी अधिक खोलात जाऊन तयारी करायला आवडली असती. त्यामुळे जेवढा वेळ मिळाला तेवढय़ातच पूर्ण तयारी करून उतरणे भाग होते. मुळात चंद्रकांत कुलकर्णी हा उत्तम दिग्दर्शक आहे. त्याला काम चोख लागते. त्यामुळे पहिल्या दोन टेकमध्ये दृश्य त्यांच्या मनासारखे झालेच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. महेश मांजरेकरही उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यामुळे या दोघांचाही अनुभव व मार्गदर्शन माझ्यासाठी फायदेशीर ठरले.
-अश्विनी भावे, अभिनेत्री
संकलन-शेखर जोशी. छायाचित्र- प्रदीप दास, संतोष परब