चंद्रकांत कुलकर्णी यांचे मत
‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांची टीम लेखक प्रशांत दळवी, अजित दळवी हे आणखी एक राजकीय पाश्र्वभूमी असलेला चित्रपट घेऊन येत आहेत. १ मे च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘दुसरी गोष्ट’ हा चित्रपट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आयुष्यावर बेतला आहे, अशी चर्चा होती. मात्र, ‘दुसरी गोष्ट’ ही कोणा एका राजकीय व्यक्तीची गोष्ट नाही. उलट, आजवर राज्यातील अनेक नेत्यांशी साधम्र्य असणारे १० नेते तरी तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळतील, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
‘दुसरी गोष्ट’ चित्रपटामागची गोष्ट ऐकवण्यासाठी चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी आणि चित्रपटाची निर्मातीत्रयी ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर, डॉ. शैलजा गायकवाड आणि मंजिरी हेटे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयात भेट दिली. चित्रपटाला राजकीय पाश्र्वभूमी असली तरी तो तथाकथित ‘राजकीय’पट कसा नाही इथपासून ते ‘दुसरी गोष्ट’च का? पहिली का नाही, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांशी झालेल्या गप्पांमधून उलगडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आजचा दिवस माझा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर निर्माता त्रयीने आमच्याशी संपर्क साधला आणि ‘जीवनगाणी’साठी चित्रपट करण्याविषयी विचारले. आपले काम पाहून आपल्याला विश्वासाने दुसरे काम दिले जाते, यासारखी समाधानाची आणि आनंदाची दुसरी गोष्ट नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा चित्रपट म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाची, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराची कहाणी आहे, असे सांगितले.
‘दुसरी गोष्ट’ म्हणजे नेमके काय याचा खुलासा करताना पटकथा लेखक प्रशांत दळवी यांनी आपल्याला आयुष्यात देणगी म्हणून मिळालेली एक गोष्ट असते ती म्हणजे जन्म. या जन्माबरोबर जात, धर्म, आर्थिक परिस्थिती मिळून आपली एक गोष्ट तयार झालेली असते, जी आपल्या हातात नसते. त्यानंतर माणूस स्वत:च्या जिद्दीने, मेहनतीने, कर्तृत्वाने घडवतो ती ‘दुसरी गोष्ट’. त्याची ही कथा असल्याचे सांगितले. सर्वसामान्य माणसाच्या क र्तृत्वाचा प्रवास यात मांडला असून हा केवळ राजकीयपट नाही तर त्यातून मानवी चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दळवी यांनी सांगितले.
या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले बऱ्याच काळानंतर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना भारतात आज तरुणांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात आहे. ते या चित्रपटापासून कोणती प्रेरणा घेतील आणि त्यांना शाश्वत स्वरूपाचे आपण काय देऊ शकू?,  हा विचार निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांनी केल्याबद्दल विक्रम गोखले यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ‘दुसरी गोष्ट’ हा माझ्याही जवळचा चित्रपट आहे. माझ्यासारखा न-नट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसा पोहोचला, याची माझीही दुसरी गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्शून जाणारा असा हा चित्रपट असेल, असे त्यांनी खात्रीने सांगितले.
तर चित्रपटनिर्मितीत उतरलेल्या प्रसाद महाडकर यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात ‘जीवनगाणी’ रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत असल्याने आम्ही चित्रपटनिर्मितीत उतरलो असून ‘दुसरी गोष्ट’ हा आमचा पहिलाच चित्रपट आहे, असे सांगितले.
तर व्यवस्थापन क्षेत्रातील मंजिरी हेटे आणि डॉ. शैलजा गायकवाड यांनी हा चित्रपट खास करून आजच्या युवा पिढीसाठी असल्याचे सांगितले. आयुष्यात पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी संकटे, अडचणी यावर जिद्दीने मात केली आणि सर्व ताकदीनीशी प्रयत्न केले तर ते स्वप्न सत्यात येऊ शकते, हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie dusari goshta team in loksatta office
First published on: 30-04-2014 at 08:33 IST