सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे. मी मूळ शेतकरी आहे. माझ्या जवळ जमीन ठेवुन आत्महत्या करण्यापेक्षा ती विकून काहीतरी सृजनात्मक निर्मिती करेल या विचाराने आपण बागायती जमीन विकली. त्या रकमेतून ‘ख्वाडा’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिवाळी नंतर दुसऱ्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितले.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत आणि भाऊराव कऱ्हाडे लिखीत, दिग्दर्शित १३ विविध पुरस्कारांनी नावाजलेला ख्वाडा मराठी चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात रसिकांच्या भेटीस येत आहे. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शशांक शेंडे, नवोदित कलाकार भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर, मोरे यावेळी उपस्थित होते. चित्रपटाला विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्याच कालावधीत वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट पडद्यावर येत होते. त्यामुळे चित्रपटाच्या भाऊगर्दीत आपला चित्रपट नको म्हणून आम्ही चित्रपट प्रदर्शन लांबणीवर टाकले. त्यात निधीही पुरेसा उपलब्ध होऊ शकला नाही तसेच अन्य काही कारणांमुळे पाच वेळा चित्रपट पुढे ढकलला गेला. चित्रपटात सर्व नवखे कलाकार असले तरी मातीत राबणारे आहे. यातील एकाही कलाकाराने रंगभूषा केलेली नाही. कलाकाराला विषय समजावा, भूमिकेचे विविध आयाम लक्षात यावे यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण ज्या ठिकाणी करायचे आहे, त्या ठिकाणी जाऊन दोन महिने कार्यशाळा घेतली. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान, बोलीभाषा याचा अभ्यास त्यांना करता आला.
दुसरीकडे आपसूक त्यांची त्वचा काळंवडल्याने वेगळ्या रंगभूषेची गरज पडली नाही. यातील नायक व खलनायक ग्रामीण भागातील असले तरी अभिनेत्री रसिका चव्हाण ही मुंबईची आहे. चित्रपटात तिला एकही संवाद नाही. तिने जो काही संवाद साधला तो डोळे आणि देहबोलीच्या माध्यमातून. एकही संवाद तिच्या तोंडी नसतांना तिची भूमिका लक्षात राहण्यासारखी असल्याचे कऱ्हाडे यांनी सांगितले. शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर सध्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित विविध संकटे उभी असल्याचे सांगितले. त्यातून बाहेर पडतांना आत्महत्येचा अवलंब करण्यापेक्षा मी शेतकरी आहे, मी लढणार असे म्हणून तो स्थलांतराचा पर्याय निवडतो. मात्र स्थलांतराने प्रश्न सुटतात असे नाही तर नव्याने वेगळ्या प्रश्नांची मालिका समोर उभी राहते. याच मालिकेचे प्रतिनिधीत्व करणारे मेंढपाळ कुटूंब चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
चित्रपटात वैष्णवी ढेरे, योगेश डिंबळे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे यांच्यासह अन्य कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘ख्वाडा’चे प्रदर्शन पाच वेळा स्थगित- भाऊराव कऱ्हाडे
सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 20-10-2015 at 08:03 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie khwada