‘नजर’ हा स्त्रीप्रधान चित्रपट दिग्दर्शक गोरख जोगदंडे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारी असल्येचे सांगत, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पुरुषप्रधान चित्रपटांची संख्या खूप असून, त्या तुलनेत स्त्रीप्रधान चित्रपटांची संख्या नगण्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीतही काहिसं असंच गणित आहे, त्यामुळे स्त्रीप्रधान चित्रपट बनवायचा विचार डोक्यात घोळत होता. त्यामुळे ही कथा सुचल्याचे कथेमागची संकल्पना विशद करताना ते म्हणाले.
‘नजर’ची कथा एका अशा तरूणीभोवती गुंफण्यात आली आहे, जी गावात राहते. डोळ्यांनी अंध असली तरी दिसायला देखणी असणारी फुलवा आपल्या वडिलांसोबत राहत असते. त्या गावात पुष्कर नावाचा तरूण तलाठ्याची नोकरी करण्यासाठी येतो. फुलवाला पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो. फुलवा अंध असल्याचं ठाऊक असूनही तो तिच्यावर प्रेम करतो. फुलवाही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागते. प्रेमाचं हे नातं नकळत साऱया मर्यादा ओलांडतं. त्यानंतर पुष्करला अचानक मुंबईला जावं लागतं. मुंबईला गेलेला पुष्कर गावाकडे परततो का? फुलवाचं प्रेम त्याला पुन्हा गावाकडे आणण्यात यशस्वी होतं का? पुष्करचं नेमकं काय होतं की तो गावाकडे येत नाही? तो तिला फसवतो की आणखी कोणत्या अडचणीत सापडतो? नेमकं कोण फुलवा आणि पुष्करच्या प्रेमातील अडसर ठरतं ते मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.
अजय आर. गुप्ता, दिलीप वाघ आणि डॉ. हरी कोकरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात स्वप्निल राजशेखर, तेजा देवकर, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, विजय गोखले, प्रदिप पटवर्धन आणि किशोर चौगुले इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनीच चित्रपटाची कथा लिहिली असून, डॉ. हरी कोकरे यांच्यासेबत त्यांनी पटकथालेखनही केलं आहे. सन्ना मोरे यांनी या चित्रपटासाठी संवादलेखन केलं आहे. योगेश मार्कंडे यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन आणि राज पवार यांनी संगीत दिलं आहे.
‘व्हिजन आर्ट्स’ची प्रस्तुती असलेला ‘नजर’ हा मराठी चित्रपट येत्या ६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना स्त्रीप्रधान कथानकाबरोबरच प्रेमकथा पाहायला मिळेल.