गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांकडे तरुणाईचा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे. अलिकडच्या काळात जे काही चित्रपट प्रदर्शित झाले यामध्ये अनेक तरुण दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी उत्तमरित्या त्यांची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ही तरुणाई केवळ चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा निर्मितीच करत नाहीये. तर त्यासोबतच नवनवीन तंत्राच्या माध्यमातून नव्या शैलीत कलाकृती सादर करत आहेत. असाच एका नवा प्रयोग दिग्दर्शक भावेश पाटील त्यांच्या आगामी ‘रहस्य’ या चित्रपटात करताना पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिल्म मेकिंग आणि अॅनिमेशनचे शिक्षण घेतलेल्या भावेश यांना चित्रपटाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक लघुपटांची निर्मिती केल्यानंतर व्यावसायिक चित्रपटाचे दिग्दर्शन करावे या इच्छेतून त्यांनी ‘रहस्य’ चित्रपटाच्या दिग्दर्शन व निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘प्रत्येकाचा पहिला चित्रपट हा खूप ‘पर्सनल’ असतो. लघुपटनिर्मिती नंतरचा हा चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रयोग होत आहेत. आमच्या चित्रपटातही तंत्राचा अविष्कार पहायला मिळणार आहे. आमचा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास भावेश पाटील व्यक्त करतात. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी फ्रेशर म्हणून काम केलेलंच असतं. त्यामुळे नव्यांना संधी देणंही तितकंच गरजेचं आहे. ‘रहस्य’ चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे’, असं भावेश पाटील यांनी सांगितलं.

वाचा : माय तशीच लेक; आईची कार्बनकॉपी आहेत ‘या’ अभिनेत्री

रहस्यमय थरार आणि नास्तिकता यांची सांगड घालत ‘रहस्य’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे. लकी बडगुजर, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. गायक सुनिधी चौहान, आदर्श शिंदे, प्रेम कोतवाल, यामिनी चव्हाण या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie rahasya direct by bhavesh patil ssj
First published on: 19-01-2020 at 15:29 IST