‘धग’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर शिवाजी लोटन-पाटील ‘राजवाडा’ हा दुसरा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. दीपक पारखे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात शीर्षकाप्रमाणेच एका राजवाडय़ाभोवती गोष्ट गुंफण्यात आली आहे. एका संस्थानिकाची रसातळाला गेलेली अवस्था, कर्जबाजारीपणा यातून अखेरीस आपला राजवाडा तरी वाचविण्याचा प्रयत्न तो करतो असे थोडक्यात कथानक आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
दिवाळखोरीत निघालेल्या संस्थानिकाची अवस्था आणि त्यावर भाष्य करण्यासाठी शिवाजी लोटन पाटील यांनी या चित्रपटात विनोदाचा आधार घेतला आहे. आपली परंपरा, वारसा आपणच सांभाळायचा असतो हे चित्रपट सांगतो. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितले. कथा-पटकथा-संवादलेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. गाजलेला गायक विजय गटलेवार या चित्रपटाचा संगीतकार असून मंगेश देसाई, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, अरुण कदम, कुलदीप पवार हे कलावंत प्रमुख भूमिकेत आहेत.