मराठी चित्रपटसृष्टीत ८५ कोटी रुपयांची कमाई करून पुढे चाललेल्या ‘सैराट’ चित्रपटाचे झिंगाट आता बॉलीवूडजनांनाही खुणावू लागले आहे. आत्तापर्यंत मराठी चित्रपटाने इतकी मोठी कमाई करीत हिंदी चित्रपटांसमोर आव्हान उभे केले नव्हते. मात्र ‘सैराट’च्या यशामुळे बॉलीवूडलाही या चित्रपटाची दखल घ्यावी लागली आहे. आधी इरफान खानने ‘सैराट’चा खास शो केला, त्यानंतर कपिल शर्माच्या शोमध्येही झिंगाट वाजले. आता चक्क बॉलीवूडचा लाडका निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आपल्या मित्रपरिवाराबरोबर ‘सैराट’ चित्रपट पाहण्याची इच्छा पूर्ण केली.
करण जोहरला ‘सैराट’ पाहण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे त्याने चित्रपटाच्या निर्मात्यांशी संपर्क साधून खास शोबद्दल विचारणा केली होती. करणच्या विनंतीनुसार सोमवारी रात्री त्यांच्यासाठी ‘सैराट’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. करणबरोबर मोरोक्कोतील ‘जग्गा जासूस’चे चित्रीकरण पूर्ण करून परतलेला अभिनेता रणबीर कपूर, अलिया भट्ट, वरुण धवन, मनीष मल्होत्रा, पटकथालेखक निरंजन अय्यंगार, आदित्य आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याबरोबरच सैफ अली खानची मुलगी सारा खान हिनेही हा मराठमोळा चित्रपट पाहिला. ‘सैराट’ने बॉलीवूडजनांचीही मने जिंकून घेतली. हा चित्रपट पाहिल्यानंतर करण जोहरने ट्विटरवर चित्रपटाची प्रशंसा केली. ‘चित्रपटाच्या प्रभावातून मी अजूनही बाहेर पडलेलो नाही. काल रात्री चित्रपट पाहिला, मात्र आजची सकाळही जड अंत:करणानेच उजाडली आहे,’ असे म्हणत करणने या चित्रपटाबद्दल अत्यंत आदर वाटत असल्याचे नमूद केले.




Still reeling from the tremendous impact of #Sairat …saw it last night and woke up with a heavy heart and so much respect for the film….
— Karan Johar (@karanjohar) June 14, 2016
वरुणनेही ट्विटरवर या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. वरुणने ‘सैराट… वॉव वॉव वॉव’ इतक्याच शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
#Sairat wow wow wow
— Varun JUNAID dhawan (@Varun_dvn) June 13, 2016