सध्या सर्वत्र ऑस्कर पुरस्कार आणि त्यामध्ये भारतीय चित्रपटांना मिळणार स्थान याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत. योगायोग म्हणजे ‘न्यूटन’ या चित्रपटासोबतच एका मराठी दिग्दर्शकानेही या चर्चेमध्ये उडी घेतली. ‘श्वास’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘नदी वाहते’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘श्वास’ या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवलं होतं पण, ‘नदी वाहते’ला चित्रपटगृहांमध्ये स्थान मिळवतानाही काही अडचणी आल्या. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी ‘स्क्रॅबल एण्टरटेन्मेंट’ने घातलेल्या गोंधळामुळे मुंबई, पुणे, नाशिकमध्ये ठरलेल्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही, असे संदीप सावंत यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सांगितले.
हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच चित्रपटाला प्रतिसाद तर मिळतोय पण कुठेतरी हा प्रतिसाद सुरुवातीला थंडावला होता.
याविषयीच दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या डोक्यात चाललेली गणितं आणि सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती दिली. चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या हे जरी खरं असलं तरी आम्ही अशीच काहीशी आखणी केली असल्याची माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली. “चित्रपटाची सुरुवात कमी चित्रपटगृहांपासूनच करायचं आम्ही ठरवलं होतं. कारण, आम्ही चित्रपटाच्या शोजवर जास्तीत जास्त भर दिला होता. त्यासोबतच प्रसिद्धी तंत्राविषयी सांगायचं झालं तर यावेळी आम्ही साचेबद्ध प्रसिद्धी तंत्रात न अडकता ‘अदर दॅन माऊथ पब्लिसिटी’ केली. कारण चित्रपट कोणावरही लादता येऊ शकत नाही”, असं ते म्हणाले. आता हा काय नेमका प्रकार, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना याचीच उकल करत सावंत म्हणाले, “कमीत कमी बजेटमध्ये हा चित्रपच आम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये स्थानिक तरुणांच्या मदतीने आम्ही काही कार्यक्रमांचं आयोजन करत चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
चित्रपटाचं बजेट कमी असल्यामुळे समोर येणारे अडथळे त्यांनी कधीच नाकारले नाहीत. पण, सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच चित्रपट प्रदर्शित होणार त्याच दिवशी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणच्या चित्रपटगृहांमधील सर्व शो रद्द झाले. यामागे कारण होतं ते ‘हार्डडिस्क’ खराब होण्याचं. ‘स्क्रॅबल एण्टरटेन्मेंट’कडून चित्रपटाच्या ‘हार्डडिस्क’ ठरलेल्या चित्रपटगृहांपर्यंत पोहोचणार होत्या. पण अगदी शेवटच्या क्षणी त्या खराब झाल्याचं कारण आमच्यासमोर दिलं गेलं आणि पहिल्याच दिवशी सर्वकाही विखुरलं गेलं”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘स्क्रॅबल’च्या एका चुकीमुळे संवेदनशील आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाच्या चित्रपटापासून प्रेक्षक दुरावले, याची खंत सावंत यांनी व्यक्त केली. एखाद्या चित्रपटासाठी आपण, आपली टीम जीव ओतून मेहनत घेणार. पण, अगदी शेवटच्या क्षणी अशी कोणा दुसऱ्याच्या चुकीचा फटका चित्रपटाला बसणं ही बाब गंभीरच आहे.
वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती
याविषयीची माहिती देत पुढे सावंत म्हणाले, “पहिल्या दिवशीचा हा गोंधळ दुसऱ्या दिवशी सावरण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रुप बुकिंग्स वगैरे सर्व काही गडबडलं होतं. पण, शनिवारी मात्र परिस्थिती हळूहळू मार्गावर येऊ लागली. ‘नदी वाहते’ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरु लागली. रविवारी सोशल मीडिया, वृत्तपत्र, वेबसाइट्सवर चित्रपटाचे रिव्ह्यू आले आणि या कलाकृतीला मिळणारा प्रतिसाद पाहून दिलासा मिळाला”.
सध्या या चित्रपटाच्या मार्गात येणारे अडथळे कमी झाले असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचत असल्याची आशावादी भावनाही त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर सध्या अनेकांनीच या चित्रपटाविषयीच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, चित्रपटाच्या फेसबुक पेजवरही काही रिव्ह्यू पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद अप्रतिम असून, आमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची बाब आहे, असंही ते म्हणाले. ‘नदी वाहते’ चित्रपट आता प्रेक्षकांमुळेच मोठा होऊ पाहतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये किंबहुना पहिल्या आठवड्यातच चित्रपटाला अपेक्षित यश मिळेल, अशी मी आशा करतो, असं म्हणत सावंत यांनी प्रेक्षकांना एक आवाहन केलं.
सहसा चित्रपट पाहण्यासाठी जाताना प्रत्येकजण आपल्या सोयीनेच चित्रपट गृहांची निवड करतो. पण, नाटकांच्या बाबतीत असं होत नाही. नाटकं पाहण्यासाठी लांबच्या नाट्यगृहात जाण्याचीसुद्धा प्रेक्षकांची तयारी असते. हीच तयारी आणि एकंदर हाच दृष्टीकोन त्यांनी चित्रपटांच्या बाबतीतही दाखवावा आणि उपलब्ध असलेल्या चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावेत हीच एक विनंती, असं म्हणत संदीप सावंत यांनी ही मुलाखत आवरती घेतली.