सिनेमाच्या पोस्टरवरून अंदाज बांधत प्रेक्षक एखाद्या सिनेमाला जातो आणि त्याला एकदम त्याने केलेल्या अंदाजाला जबर धक्का देत काहीतरी निराळेच पाहावे लागते. तसे ‘युद्ध’ या मराठी सिनेमाच्या बाबतीत झाले आहे. व्यवस्थेविरुद्ध लढत दुष्टांचा निर्दाळ करणारा पोलीस अधिकारी पोस्टरवर पाहिल्यानंतर अपेक्षित असलेला अ‍ॅक्शनपट न होता महिलांवरच्या अत्याचाराची निव्वळ शब्दबंबाळ चर्चा करणारा चित्रपट ठरतो. अनपेक्षित विषय हे या सिनेमाचे वेगळेपण असले तरी त्याची मांडणी करताना लेखन-दिग्दर्शनाचा अभाव असल्यामुळे एकंदरीत परिणाम साधण्यात चित्रपट संपूर्ण अयशस्वी ठरतो.
महिलांवरील वाढते अत्याचार, किचकट न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्याअभावी सुटणारे गुन्हेगार याला वैतागलेली रागिणी ही पत्रकार निराळ्या पद्धतीने हा विषय माध्यमांमधून प्रकाशझोतात आणण्याचे ठरविते. ती काम करीत असलेल्या वृत्तपत्राच्या संपादकांकडून तिला नकार मिळतो आणि म्हणून रागिणी नोकरी सोडते. मग या विषयाला वाचा फोडण्यासाठी ती पत्रकार मित्र उज्ज्वल, धडाडीचा पोलीस अधिकारी गुरू नायक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारंगी देशपांडे यांच्या मदतीने रागिणी हा विषय लोकांसमोर आणते.
सिनेमाच्या पोस्टरवरून प्रेक्षकाने बांधलेला अंदाज खोटा ठरविला असला, तरी धडाडीचा पोलीस अधिकारी सिनेमाचा नायक असल्यामुळे अपेक्षित असलेली हाणामारी फक्त मध्यंतरापर्यंत दोन-तीन प्रसंगात दाखवली आहे. मात्र मध्यंतरानंतर महिलांवर अत्याचार करणारे नराधम, त्यांची मानसिकता यावर चर्चा करण्यावर चित्रपटकर्त्यांनी भर दिला आहे.
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा करून शिक्षा भोगणाऱ्या चार प्रातिनिधिक गुन्हेगारांना भेटून लैंगिक अत्याचार करण्याची मानसिकता कशामुळे निर्माण होते याचा शोध डॉ. सारंगी देशपांडे आणि रागिणी घेतात. चार केसेसमधले गुन्हेगार कसा केला अत्याचार हे सांगताना त्याचे नाटय़ रूपांतर प्रेक्षकांना दाखविले आहे.
पटकथा लेखन, प्रसंगांची रचना आणि दृष्टिकोन या तिन्ही बाबतीत दिग्दर्शकच गोंधळून गेला आहे, असे प्रेक्षकाला एकामागून एक प्रसंग पाहताना वाटत राहते. दिग्दर्शनाचा इतका अभाव असल्याने प्रमुख चार व्यक्तिरेखांची मांडणी करतानाही गडबड झाली आहे. वृत्तपत्रांतून लैंगिक अत्याचाराची प्रकरणे, त्यातील गुन्हेगारांची मानसिकता मांडल्यानंतर प्रमुख चारही व्यक्तिरेखांना समाजाच्या रोषाला जावे लागते असे दाखविले आहे. परंतु, वृत्तपत्रांतून नेमके काय प्रसिद्ध केले आहे, त्या लेखातील मजकुरात पत्रकार रागिणीने काय म्हटले आहे हे न दाखविताच चित्रपटकर्त्यांनी चित्रपटाच्या शेवटाला एकदम टीव्हीवरील टॉक शोच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार यासंदर्भात चर्वितचर्वण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रागिणी आणि पोलीस अधिकारी गुरू नायक यांचे हे युद्ध संपूर्णपणे भरकटले आहे.
राजेश शृंगारपुरेने गुरू नायक ही भूमिका केली असून रागिणी ही व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडितने साकारली आहे. तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारंगी देशपांडे ही भूमिका क्रांती रेडकरने साकारली आहे. पत्रकार व वकील असे दोन्ही असणारा उज्ज्वल ही व्यक्तिरेखा पंकज विष्णूने साकारली आहे.
पडद्यावर आपले विचार मांडताना करावी लागणारी प्रसंग रचना याबाबत लेखक-दिग्दर्शकांचा गोंधळ उडाला असून त्यामुळे चित्रपटाचा विषय वेगळा असूनही अपेक्षित परिणाम साधण्यात चित्रपट अजिबात यशस्वी होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रद्धा एण्टरटेन्मेंट प्रस्तुत
युद्ध
निर्माता – शेखर गिजरे
दिग्दर्शक – राजीव एस. रुईया
कथा – शेखर गिजरे
पटकथा – प्रकाश कदम
संगीत – विवेक कार
कलावंत – राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, शेखर गिजरे, सचिन देशपांडे, रवींद्र पाटील, गणेश सोनावणे व अन्य.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie yudh a rambled war
First published on: 17-05-2015 at 12:20 IST