‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात ना? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचे उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची. पण असं का या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मिळणार आहे. अभय पाठक प्रॉडक्शनसह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून प्रेक्षकांना ही उत्तरं मिळणार आहेत.

आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे. काही लोक धर्माचा- जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात, या गोष्टीवर ‘लग्न मुबारक’ हा चित्रपट प्रेमकथेद्वारे भाष्य करतो. तसेच या चित्रपटाला साई- पियुष यांचे संगीत असून त्यांनी संगीतबद्ध केलेले आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने डोक्यावर घेतले आहे. तसेच ट्रॉय अरिफ यांनी संगीत दिलेले एक रोमँटिक गाणे ऐकायला मिळणार आहे. ‘लग्न मुबारक’साठी अक्षय कर्डक यांनी गीतलेखन केले आहे.

चेतन चावडा- सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ मधून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव अभिनयात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन भूषण वाणी यांनी केले आहे.