‘फ्रेंडशिप डे’चा उत्साह सुरु असतानाच अनेकांच्या मनात घर केलेली मित्रांची टोळी पुन्हा एकदा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इथे पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की, ‘दिल दोस्ती दुनियदारी’ या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर नव्या कथानकावर आधारित ‘दिल दोस्ती दोबारा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. सुरुवातीला संथ पडलेल्या या मालिकेने आता रंग धरण्यास सुरुवात केली असतानाच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्याच्या घडीला झी मराठी वाहिनीवर विविध मालिका सुरु झाल्या असून प्रेक्षकही त्या मालिकांशी जोडले गेले आहेत. मालिका फार दिवस न ताणता ‘शॉर्ट अॅण्ड क्रिस्प’ हे सूत्र अवलंबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर वाहिनीचा भर असल्याचं दिसत आहे. याच सूत्राचा आधार घेत अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोमरे आणि सखी गोखले यांचा ‘खयाली पुलाव’ आता संपणार आहे. अर्थात १४ ऑगस्टपासून ही मालिका ‘ऑफ एयर’ जाणार असल्याचं कळत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या निमित्ताने नव्या जोमाचे कलाकार आणि त्यांची अफलातून मैत्री प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलली होती. पण, त्या तुलनेत ‘दिल दोस्ती दोबारा’ला मात्र यासाठी फार प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळेच बहुधा ही मालिका आटोपती घेण्यात आली असावी असा अंदाज अनेकांनी बांधला आहे.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीवर ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेची जाहिरात सुरु आहे. तेव्हा आता हीच मालिका दोस्तांच्या दुनियादारीचा ताबा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अतुल परचुरे, सुप्रिया पाठक, श्रृती मराठे अशी स्टारकास्ट असेलली ही मालिका अतिशय हलक्याफुलक्या कथानकाची असल्याचं प्रोमो पाहून लक्षात येत आहे. तेव्हा आता बायको आणि रोजच्या आयुष्यातील कचाट्यात सापडलेल्या ‘बिचाऱ्या नवरोबां’ना प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.