काहीतरी हॅपिनग हवं असेल तर नवनवीन भन्नाट फंडे आजमावेच लागतात, हा मालिकावाल्यांचा नियमच जणू. या नियमाचं पालन करण्यासाठी त्यांनी आता एक जुना  ट्रेण्ड नव्याने आणलाय, प्रेमाच्या त्रिकोणाचा!

सरळ साधं कथानक असलं तरी मालिकाकत्रे त्याला झणझणीत फोडणी देतातच. द्यायलाच हवी म्हणा. नाहीतरी नेहमीचीच ती मुळुमुळू रडणारी नायिका कोण बघणार. तसा या नायिकेच्या रडण्याला चांगला टीआरपी मिळतो बरं. पण असो. आता त्यांना काहीतरी हट के हवंय तर त्यांनी त्यांचा मार्ग शोधलाय. आता मोर्चा वळवलाय तो ‘म, पत्नी और वो’ याकडे. नाही कळलं? म्हणजे एक फूल दोन माळी. किंवा एक माळी दोन फुलं असं म्हणू या. अर्थात सध्या मराठी मालिकांमध्ये ट्रेण्ड दिसतोय तो प्रेमाच्या त्रिकोणाचा.

यात सगळ्यात पहिलं नाव अर्थात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं. या मालिकेचा विषय तसा फार नवीन नाही. याआधी ‘सवत माझी लाडकी’ किंवा ‘बीवी नंबर वन’सारख्या सिनेमांमध्ये असं कथानक बघितलं आहे. पण मालिकेत काहीतरी वेगळं असू शकेल अशी तूर्तास आशा करायला हरकत नाही. तर यामध्ये गुरुनाथ आणि राधिका या नवरा-बायकोत आली आहे शनया. गुरुनाथच्या ऑफिसमध्ये काम करणारी शनाया गुरूला तिच्या खोटय़ा प्रेमाच्या जाळ्यात ओढते. आता राधिकाला सगळं कळलंय. आता मालिका खरी रंगेल. शनायाच्या येण्याने गुरू-राधिकाचं नातं विस्कटलंय. ते पुन्हा पूर्ववत होईल का ते बघणं रंजक ठरेल.

प्रेमाच्या त्रिकोणाचा ताजा ट्रॅक सध्या ‘सरस्वती’मध्ये दिसतोय. सरस्वती आणि राघव यांच्या संसारात एंट्री झाली आहे ती साराची. साराने राघवच्याच घरी राहावं असा निर्णय राघवच्या आईने घेतला आहे. नुकताच सुरू झालेला हा ट्रॅक आता एखादं महिना तरी काही संपणार नाही, असं दिसतंय. कारण अजून दोघांमधले गरसमज, दुरावा, राग असं बरंच काही घडायचंय. पिक्चर अभी बाकी है! हा फक्त आपला अंदाज. कदाचित वेगळं चित्रही दिसू शकेल.

‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण असा थेट नसला तरी अडूनअडून तो डोकावतोच आहे. साकेत-सानिकाचं लग्न झालंय. मीरा साकेतची लहानपणापासूनची मत्रीण. त्यामुळे त्यांचं नातं खूप खास आहे. हे सानिकाला काही सहन होत नाही. तिला वाटतं मीरा आणि साकेतचं प्रेमप्रकरण सुरू आहे. असं तिला वाटणारच. मीरा-साकेत वागतातच तसे. त्यांच्यात म्हणे मत्रीचं प्रेम आहे. आता सानिका-साकेतचा संसार घटस्फोटापर्यंत गेलाय. त्यांचंही नातं विस्कटलंय. त्याची कुठेतरी सुरुवात ही मीरामुळेच झालीय. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेचंही तसंच. या मालिकेवर अतिशय टीका होत असतात. कधी विक्रांतच्या शांत, संथ, अतिसमजुतदार स्वभावावर तर कधी त्याच्या कथानकावर. या मालिकेत खरं तर कोणी कोणामध्ये येत नाहीये. पण तरी यात छुपा प्रेमाचा त्रिकोण आहेच. विक्रांत-मोनिकाचं लग्न झालंय. मोनिकाच्या लग्नाआधी गरोदर असण्याच्या प्रकरणामुळे त्या दोघांमधलं नातं तितकंसं बरं नाही. मोनिका उद्धट-उर्मट तर तिची बहीण मानसी अतिशय नम्र. त्यामुळे विक्रांतला तिचा स्वभाव, विचार आवडतात, पटतातही. म्हणून त्या दोघांचं चांगलं जमतं. तर दुसरीकडे मोनिकाशी त्याचं बिनसतं. मोनिका याबद्दल मानसीला सतत दोष देते. या मालिकेच्या सगळ्या प्रोमोमध्ये मानसी आणि विक्रांत दिसायचे. पण, मालिकेत विक्रांतचं लग्न झालंय ते मोनिकाशी. कोणास ठाऊक प्रोमो दाखवण्यामागे काही गुप्त हेतू असेल तर.. त्याची वाट पाहू या.

‘दुर्वा’मध्ये दुर्वा आणि आकाश या जोडप्यामध्ये अधेमधे येत असतो तो रंगा. रंगाचं दुर्वावर एकतर्फी प्रेम आहे. तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो कधी कधी काही चुकीच्या गोष्टी करत असतो. पण अगदी कारस्थानं करत नाही. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत मध्यंतरी प्रेमाचा त्रिकोण बघायला मिळत होता. जुई आणि यश यांच्या संसारात विभा म्हणजे जुईची सख्खी मोठी बहीण विष कालवत होती. या ना त्या कारणाने जुई-यशमध्ये फूट पाडण्याचे सर्व प्रयत्न विभा करायची. तर असा हा प्रेमाचा त्रिकोण सध्या मालिकांमध्ये गाजतोय. बॉलीवूडने गाजवलेला हा फंडा आता मालिकांमध्येही दिसू लागलाय. एकाची हार तर दुसऱ्याची जीत हे बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. त्यातच जर अशा ट्रेण्डचा तडका असेल तर मालिका आणखी रंगते यात शंका नाही.