महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आधारित असलेला, या भागातील नागरिकांचा संघर्ष मांडणारा व त्याला प्रेमकथेची जोड असणारा ‘मराठी टायगर्स’हा चित्रपट येत्या ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे. कर्नाटक राज्यात हा चित्रपट प्रदíशत करण्यास बंदी घालण्यात आल्याने चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह विक्रम गोखले, विद्याधर जोशी, किरण शरद, महेश महादेव, डॉ. तेजा देवकर, विकास पाटील, अश्विनी एकबोटे आणि बॉलीवूड अभिनेते आशीष विद्यार्थी हे कलाकार आहेत. आपल्या भूमिकेविषयी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मी या चित्रपटात ‘शिवा पाटील’ ही भूमिका करीत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेली अनेक वष्रे सुरू आहे. तेथील मराठी माणसांची वेगवेगळ्या प्रकारे गेली अनेक वष्रे कशा प्रकारे मुस्कटदाबी सुरू आहे, ते या चित्रपटाच्या निमित्ताने जवळून पाहायला मिळाले. कोणत्याही कलाकृतीने करमणूक जरूर करावी पण त्याचबरोबर समाजासाठीही काही तरी द्यावे. सीमाप्रश्नावर उद्या जर का वणवा पेटला तर त्याची ठिणगी होण्याचे भाग्य ‘मराठी टायगर्स’या चित्रपटाला मिळणार आहे. गेली अनेक वष्रे सुरू असलेल्या सीमावासीयांच्या या संघर्षांला प्रत्येक मराठी माणसाने पािठबा दिला पाहिजे, अशी भावना हा चित्रपट पाहून प्रत्येकाच्या मनात नक्कीच प्रबळ होईल.
अभिनेते विद्याधर जोशी यांनी सांगितले, कोणत्याही प्रश्नाकडे जर सामंजस्याने पाहिले तर तो प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होते, तो प्रश्न सुटू शकतो, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या मनात गेली अनेक वष्रे हा प्रश्न खदखदत असून प्रत्येक मराठी माणसाने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहावे. चित्रपटाचे पटकथा लेखक व दिग्दर्शक अवधूत कदम यांच्या मते चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून समाजावर त्याचा मोठा प्रभाव व परिणाम होत असतो. ‘मराठी टायगर्स’च्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटक हा ज्वलंत सामाजिक विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येक मराठी माणसाने आम्हाला नतिक पािठबा द्यावा.
चित्रपटाचे संवाद प्रताप गंगावणे यांचे असून नवीन हंगड हे निर्माते आहेत. अभिजीत तशीलदार हे सहनिर्माते तर प्रशांत कुलकर्णी हे कार्यकारी निर्माते आहेत. सहाशे स्क्रीन घेऊन हा चित्रपट एकाच वेळी सर्वत्र प्रदíशत होत आहे.