‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता योगेश सोहोनीला मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर ८ मे रोजी लुटले. सोमाटणे येथे ही घटना घडली आहे. एका कार चालकाने योगेशकडून ५० हजार रुपये काढून घेतले. योगेशने एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

योगेशने नुकताच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘गेल्या शनिवारी म्हणजे ८ मे रोजी मी सोमाटणे फाट्याजवळ पोहोचताच एका एसयुव्ही चालकाने मला गाडी थांबवण्यास सांगितली. कार चालक माझ्या गाडीजवळ आला आणि तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला असे बोलू लागला. मला ते ऐकून आश्चर्य वाटले’ असे योगेश म्हणाला.

आणखी वाचा : लेकीचे पत्र पाहून शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

पुढे तो म्हणाला, ‘या अपघातामध्ये एकजण जखमी झाला असून मी पोलीसात तक्रार देईन अशी धमकी तो व्यक्ती मला देऊ लागला. जर तक्रार द्यायची नसेल तर सव्वा लाख रुपये दे अशी मागणी तो करु लागला. मला महत्त्वाचे काम असल्यामुळे पुण्याला पोहोचण्याची घाई होती. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे तो मला बळजबरीने सोमाटणे फाट्याजवळील एका एटीएममध्ये घेऊन गेला. त्याने माझ्याकडून ५० हजार रुपये घेतले.’

सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटली आहे. त्यानंतर योगेशने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस संबंधीत आरोपीचा शोध घेत आहेत.