संगीतक्षेत्र आणि कल्पनाविश्व या दोन्ही एकमेकांना जोडलेल्या गोष्टी आहेत. तसं पाहायला गेलं तर या संपूर्ण विश्वात प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडली गेली आहे. वेळ साधायची असते ती फक्त तो जोडलेला संबंध ओळखायची आणि संदर्भ समजून घेण्याची. हे कल्पनांचं जाळं आणखीनच गुंतण्यापेक्षा आपण थेट जाणार आहोत सुमधूर आवाजाच्या एका गायिका आणि अभिनेत्रीच्या किताबखान्याची सैर करण्यासाठी.
एक गायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आलेली ही चिमुरडी मोठी होऊन अभिनेत्री म्हणून नव्या रुपात सर्वांसमोर आली. तिचं हे नवं रुप पाहून अनेकांच्याच तोंडून उच्चार निघाले… ‘अरे ही तर तिच… लिटील चॅम्प्सची स्पर्धक केतकी…’ गायिका ते अभिनेत्री असा तिचा प्रवास आपण सर्वांनीच पाहिला आहे. किंबहुना या कलाविश्वात केतकीच्या प्रवासाचे तुम्हीही साक्षीदार राहिले असाल असं म्हणायला हरकत नाही. अशा या कलासक्त केतकीचा किताबखाना कसा असेल, तिची वाचनाची आवड नेमकी काय असेल, हा प्रश्न एकदा तरी तुमच्या मनात घर करुन गेला असेल. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर खुद्द केतकीनेच दिलं आहे.
‘मोजक्या शब्दांत मांडायचं झालं तर मला काल्पनिक कथा वाचायला fantacy books फार आवडतात. मुळात मी इंग्लिश लिटरेचरची विद्यार्थीनी असल्यामुळे आणि कुटुंबातही इंग्लिश लिटरेचरच्या दृष्टीने पुरक वातावरण असल्यामुळे तो मला मिळालेला वारसाच आहे. मराठी वाचनाकडेही माझा कल आहे. पण, इंग्लिश लिटरेचरमुळे काल्पनिक कथा अर्थात फॅन्टसीची पुस्तकं वाचण्यात मी रमते’, असं केतकीने सांगितलं.
‘शेक्सपिअरपासून ते विलियम वर्ड्सवर्थच्या कवितांपर्यंत सर्व काही वाचायला मला आवडतं. त्यातही काही ठराविक पुस्तकांची नावं सांगायची झाली तर, ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’, ‘द प्रोफेट’, ‘अनपोस्टेड लेटर’ ही माझ्या किताबखान्यातील पुस्तकं माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहेत. असं सांगत तिने धार्मिक, व्यावसायिक पुस्तकं वाचनाच्या आवडीविषयीही सांगितलं.
पुस्तक वाचायचं म्हणजे नवनवीन प्रकारचं ज्ञान संपादन करायचं असाच खरंतर त्याचा अर्थ होतो. अर्थात ज्ञान हे कुठेही आणि कसंही मिळतं. त्याचे कोणते निकष वगैरे नसतात. त्यामुळे मी एकाच प्रकारच्या पुस्तकांपेक्षा सर्व प्रकारच्या वाचनाला प्राधान्य देते असं ती म्हणाली.
एक गायिका म्हणूनही वाचनाकडे पाहण्याचा केतकीचा दृष्टीकोन फार प्रगल्भ आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवलं. पं. जितेंद्र अभिषेकी यांचं आत्मचरित्र हे केतकीच्या किताबखान्यातील तिचं आणखी एक आवडतं पुस्तक. त्यासोबतच गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं पुस्तकही तिला फार आवडतं. मुख्य म्हणजे एक गायिका म्हणून आणि एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किशोरी ताईंचा इतर गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टीकोन होता तोच त्यांच्या पुस्तकातही मांडला आहे, असं केतकी म्हणाली. १२०० ते १३०० पुस्तकांच्या गर्दीत आणि या विविधतेने नटलेल्या किताबखान्यात तिने गुलजार यांच्या पुस्तकांचाही उल्लेख केला. गुलजार साहेबांची लेखनशैलीसुद्धा मला फार भावते असं म्हणत तिने या किताबखान्याचा सुरेख पसारा आटोपता घेतला.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com