मंगळवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत एका हॉटेल मधून बाहेर येत असतानाच काही छायाचित्रकारांनी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. पण, शिल्पा आणि राज कारमध्ये बसताच त्यांच्या कारमागे धावणाऱ्या छायाचित्रकारांना मुंबईतील बॅस्टियन हॉटेलच्या अंगरक्षकांनी मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फ्री प्रेस जर्नल’ने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शिल्पा आणि राज त्या हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी गेले होते. त्यानंतर ते दोघंही जेव्हा हॉटेलबाहेर आले तेव्हा छायाचित्रकारांनी त्यांची एक झलक टिपण्यासाठी गर्दी केली. शिल्पा आणि राजनेही त्यांना नाराज केलं नाही. या दोघांनीही काही क्षण छायाचित्रकारांसमोर पोझ दिल्यानंतर पुढची वाट धरली. पण, शिल्पा आणि राज त्यांच्या कारमध्ये बसताच त्या ठिकाणची परिस्थिती बदलली. शिल्पाची कार तिथून निघाली त्याचवेळी हॉटेलचे अंगरक्षक छायाचित्रकारांना मारहाण करु लागले. त्यांना मोठ्या ताकदीने मागे ढकलू लागले. छायाचित्रकारांनीही त्या अंगरक्षकांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याधीच अंगरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती.

यासंबंधीचा एक व्हिडिओ ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंगरक्षक आणि छायाचित्रकारांदरम्यान झालेली हाणामारी पाहायला मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये एका छायाचित्रकाराला जास्त दुखापत झाली असून, त्याने रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान, त्यावेळी पोलिसांची मदत घेण्यासाठी ‘१००’ या हेल्पलाइन क्रमांकावर छायाचित्रकारांनी फोन लावला असता त्यांचा तो प्रयत्नही असफल ठरला. पण, त्याच घटनेनंतर जवळपास तासाभराने जेव्हा हॉटेल मालकाने पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा मात्र पोलीस लगेचच घटनास्थळी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

तसं पाहायला गेलं तर सेलिब्रिटी चर्चेत येण्यामागे, त्यांच्या प्रसिद्धीमागे छायाचित्रकारांचाही सहभाग असतो. पण, त्यांना अनेकदा चुकीच्या पद्धतीने वागवलं जातं. सेलिब्रिटींकडून मिळणारी वागणूक, कोणत्याही ठिकाणी गेल्यावर अंगरक्षकांकडून होणारी धक्काबुक्की हे सर्व प्रकार थांबवण्याची गरज असून, आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media photographer allegedly attacked by bodyguards of bollywood actress shilpa shetty kundra for clicking her pictures
First published on: 08-09-2017 at 11:51 IST