मनोरंजन विश्वात काम करणारी ‘साम, दाम, दंड भेद’ मालिका फेम अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिनं तिला आलेला धक्कादायक अनुभव #MeToo मोहिमेअंर्तगत शेअर केला आहे. तिनं कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.

सोनलचा आरोप…
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं अंगावर काटा अणणारा अनुभव सांगितला आहे.

‘मी १९ वर्षांची होती. मला ऑनलाइन पोर्टलवरून ऑडिशनबाबत समजलं. माझी ऑडिशन खूप वाईट गेली. ही ऑडिशन कास्टिंग डायरेक्टर राजा बजाज यांनी घेतली होती. मी संवाद उत्तम बोलू शकले नाही कारण मला अभिनयाचा कोणताच अनुभव नव्हता. मला नकार मिळाला. पण मी सुंदर दिसते त्यामुळे काही गोष्टी शिकले तर मला नक्की पुढे संधी मिळू शकतात असंही त्यांनी मला सांगितलं. त्यासाठी मला त्यांनी साहय्यक म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याबाबत विचारलं. ते छायाचित्रकारही होते.

मी एका चित्रीकरणासाठी त्यांच्यासोबत लोणावळ्याला गेले. त्यांनी मला मॉडेलचे काही कपडे घालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मी कपड्यांची ट्रायल घेण्यास नकार दिला. मी माझ्या हॉटेल रुममध्ये परतले. त्यानंतर मला राजा मद्यपान करता दिसले. माझ्यासाठी सर्वच धक्कादायक होतं. थोड्यावेळानं ते माझ्या खोलीत आले. मी तुला तांत्रिक विद्या शिकवणार आहे ज्यामुळे तू रातोरात प्रसिद्ध होशील. पण त्यासाठी तू विवस्त्र हो आणि माझ्यासमोर बस आणि माझ्यामागोमाग मंत्रोच्चार कर असं त्यांनी मला सांगितलं. माझ्यासाठी हे आणखी धक्कादायक होतं मी जवळजवळ त्यांच्यावर ओरडले. त्यांनी जबरदस्ती करत माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला.

मी कशीबशी स्वत:ला वाचवण्यासाठी खोलीबाहेर पळाले. फोटोशूटसाठी आमच्यासोबत मॉडेल आणि तिची आई आली होती. या दोघांनाही मी घडलेला प्रकार सांगितला. काही वेळानंतर राजा बजाज यांनी आपलं सामान तिथेच टाकून पळ काढला असल्याचं मला समजलं.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१२ मध्ये सोनलनं कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकात राजा बजाज यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावेळी सोनलसोबत असलेल्या मॉडेल आणि तिच्या आईनंही जबाब नोंदवला होता. मात्र सोनलनं केलेले आरोप राजा बजाज यांनी फेटाळून लावले आहेत. सोनलनं पैशांची मागणी केली होती. पण, पैसे न दिल्यानं तिनं गंभीर आरोप केले आहेत असं म्हणत राजा यांनी सोनलचे आरोप फेटाळून लावले आहेत.