ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटांपासून ते जगभरातील प्रमुख शहरांच्या समस्यांचे प्रतिबिंब असणारे लघुपट, माहितीपट, अॅनिमेशनपट यांची अनोखी पर्वणी यंदाच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (मिफ्फ) मध्ये अनुभवता येणार आहे. तेराव्या ‘मिफ्फ’ महोत्सवाच्या माध्यमातून लघुपट चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्याचा मुख्य उद्देश असल्याचे महोत्सवाचे संचालक आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक व्ही. एस. कुंडु यांनी सांगितले. त्यामुळे हा विचार समोर ठेवूनच ‘मिफ्फ’मध्ये लघुपटांचे विविध पॅकेजेस देण्यात आले आहेत.
‘मिफ्फ २०१४’ ची सुरुवात ३ फेब्रुवारीपासून एनसीपीए येथे होणार आहे. एकाच वेळी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, गुवाहाटी, चेन्नई आणि नागपूर अशा सात मोठय़ा शहरांमधून हा महोत्सव भरवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिफ्फ’चा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत नेदरलॅण्ड्स येथील ‘लेनेप मीडिया आणि सिनेकिड्स’च्या माध्यमातून ‘लेनेप किड्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून लहान मुलांसाठी बनवण्यात आलेले लघुपट, अॅनिमेशनपट आणि त्यांच्याशी संबंधित विषयांवरच्या कार्यशाळांचा या किड्स फेस्टिव्हलमध्ये समावेश असणार आहे. याशिवाय, ‘शहरनामा’ या अनोख्या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून जगभरातील विविध शहरांच्या समस्या मांडणाऱ्या लघुपटांचा यात समावेश असणार आहे. ‘मिफ्फ’ मध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्याही २२ वरून ३२ एवढी वाढवण्यात आली असल्याची माहिती कुंडू यांनी दिली. यात नेहमीच्या पुरस्कारांबरोबर निर्माता, संकलक, अॅनिमेटर, सिनेमॅटोग्राफर आणि साऊंड रेकॉर्डिस्टनाही या वर्षी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेक्सिकोपासून जॉर्जियापर्यंत आणि कॅनडापासून बल्गेरियापर्यंत
विविध देशांतील लघुपटांची एक झलक यंदाच्या महोत्सवात पाहायला मिळेल. यात प्रामुख्याने मेक्सिकन लघुपट, पूर्व युरोपीय देशांतील उत्कृष्ट लघुपट, जर्मनीतील लघुपट महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय, महोत्सवाचा ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ही जर्मन लघुपट दिग्दर्शक वेर्नेर हेरझॉग यांच्या लघुपटांना समर्पित करण्यात आला आहे. याशिवाय, स्कॉटिश लघुपटकार जॉन ग्रिअर्सन यांच्या ट्रस्टची निर्मिती असलेले निवडक लघुपटही यात असणार आहेत. तर अॅनिमेशनपटांनाही महत्त्व देण्यात आले असून यासाठी कॅनडाच्या नॅशनल फिल्म बोर्डाचे अॅनिमेशनपट आणि बल्गेरियन अॅनिमेशनपटही महोत्सवात आहेत.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट
या वेळच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय विभागात डेलान मोहन ग्रे यांची ‘फायर इन द ब्लड’, इयान मॅकडोनल्डची ‘अॅल्गोरिदम’, शाई हेरेडिया यांची ‘आय अॅम मॅक्रो’, किम लाँगिनोटो यांची ‘सलमा’, जोशुआ ओपनहेमर यांची ‘द अॅक्ट ऑफ किलिंग’ आणि निष्ठा जैन यांच्या ‘गुलाबी गँग’ या लघुपटांमध्ये चुरस असणार आहे. तर भारतीय लघुपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांची ‘सेल्युलॉइड मॅन’, सत्यांशू आणि देवांशू सिंग यांची ‘तमाश’, राजा शबीर खान यांची ‘शेफर्ड्स ऑफ पॅरेडाइज’, गोविंद राजू यांची ‘गोल्डन मँगो’ आणि सुनंदा भट्ट यांच्या ‘हॅव यु सीन द अराना’ या लघुपटांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
‘मिफ्फ २०१४’
ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघुपटांपासून ते जगभरातील प्रमुख शहरांच्या समस्यांचे प्रतिबिंब असणारे लघुपट, माहितीपट, अॅनिमेशनपट यांची अनोखी पर्वणी यंदाच्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (मिफ्फ) मध्ये अनुभवता येणार आहे.
First published on: 02-02-2014 at 12:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miff mumbai international film festival