इतिहासात घर करून राहिलेल्या अनेक प्रेमकथा.. कधी चित्रांमधून, कधी लोकसंगीतातून, कधी कुठल्या लेण्यांवर कोरलेल्या दगडी शिल्पांतून जिवंत प्रेमकथांचा सळसळता झरा वाहत राहतो. आजच्या काळात जिथे प्रेमही इन्स्टंट आहे, जिथे प्रेमाला वेग आहे तिथे केवळ आवेगातून, मनाच्या ओढीला कुठल्याही व्यवहाराचा किनारा न देता वाहत गेलेल्या प्रेमाच्या गोष्टी पटवून देणे फारसे सोपे नाही. रोमिओ-ज्युलिएट, हीर-राँझा, सोहनी-महिवाल या प्रेमी जोडय़ांच्या कथा अजूनही येतात तेव्हा त्या कवितेतून, नाटकांतून..चित्रपटांच्या गर्दीत हल्ली तशा त्या दिसत नाहीत. ना कथा-कादंबरीतूनही जिवंतपणे उतरतात. ‘मिर्झया’ या राकेश मेहरा दिग्दर्शित चित्रपटातून मिर्झा-साहिबाची कथा नव्याने पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत जो गुलजार योग आहे तसाच तो गाण्यांच्या बाबतीतही आहे. इंडी-पॉप फ्युजनच्या सुरांमध्ये ‘आवे रे हिचकी..’च्या सुरावटीतून घोळत ‘मिर्झया’ची कथा जेव्हा कानांमध्ये वाऱ्यासारखी शिरते तेव्हा मन ‘गुलजार’न झाले तरच नवल! या गुलजार गाण्यांसाठी हा शब्दप्रपंच..

गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून शतकांपूर्वीची मिर्झा-साहिबाँची प्रेमकथा नव्याने जिवंत झाली आहे. ‘मिर्झया’ या चित्रपटाच्या रूपाने ती रुपेरी पडद्यावर अवतरली असली तरी गाण्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचणारी त्यांच्या प्रेमाची किमया अद्भुत आहे. ‘मिर्झया’ या चित्रपटाच्या निमित्ताने गीतकार गुलजार आणि संगीतकार म्हणून शंकर महादेवन, एहसान नुरानी आणि लॉय मेंडोसा ही त्रिमूर्ती एकत्र आली आहे. हिंदी चित्रपटाच्या प्रथेनुसार सध्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्याची गाणी आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. ‘मिर्झया’ हा चित्रपट जर बाजूला ठेवला तर त्याची गाणी ही एक स्वतंत्र प्रेमकथा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये इतकी या चित्रपटाची गाणी वेगळी ठरली आहेत. पंजाब प्रांतात अनेक प्रेमकथा चिरतरुण आहेत. मिर्झा-साहिबाची कथाही त्यातलीच.. पण इथे मिर्झयाचं प्रेम आणि साहिबाँची दास्ताँ निराळीच आहे. म्हणूनच मिर्झयाची ओळख करून देताना ‘मरता नही ये इश्क मिर्झया, सदियाँ साहिबाँ रेहती है..’ अशी साद ऐकायला मिळते. मिर्झाचं बेभान प्रेम आणि प्रेमात सर्वस्व हरवतानाही आपल्या जवळच्यांच्या रक्ताने मिर्झाचे हात रंगू नयेत म्हणून त्याच्याही नकळत आपल्या प्रेमाचा गळा घोटणाऱ्या साहिबाला प्रेमाच्या ओलाव्यापेक्षा रागाच्या रंगानेच पाहिलं जातं. त्यामुळे मिर्झा-साहिबाच्या या आगळ्यावेगळ्या कथेला संगीताचे परिमाण देताना शंकर महादेवन यांनी लोकसंगीताचा आधार घेतला आहे. एकेक गाणं ही एक स्वतंत्र कथा असावी इतक्या सुंदर पद्धतीने घडवलेली ही गाणी आजच्या हिंदी चित्रपट संगीतात ऐकायला मिळणं कठीण..

‘मिर्झया’ या पहिल्याच शीर्षकगीतासाठी दलेर मेहंदीचा आवाज ऐकायला मिळतो. मात्र इथेही दलेरच्या साथीला पाकिस्तानी गायक सैन झहूर, बलूची लोकसंगीत गायक अख्तर छानल आणि नूरानी भगिनींचा आवाज या गाण्यात आहे. मिर्झाच्या प्रेमाचे ओळख करून देणारे हे गाणे, एका युगातून दुसऱ्या युगात सातत्याने चाललेला त्याचा प्रवास, त्याच्या प्रेमाचा शेवट संघर्षांचाच, रक्तरंजित, आगीसारखा धगधगता असा. त्या आगीत चार प्रेमाचे शब्द पडले तरी त्याच्या ज्वाला भडकणार आणि त्याची धग जाणवणार तरीही त्याचे प्रेम व्याकूळतेने शोधणारी ही धरा त्याचेच गीत कित्येक वर्ष गाते आहे. मिर्झा आणि साहिबा दोघेही लहानपणी एकत्र वाढले तरी एका काळानंतर एकमेकांपासून दूर झाले. साहिबा मिर्झाची वाट पहात राहिली. आवे रे हिचकी. हे राजस्थानचे लोकगीत. दूरगावी असलेल्या प्रियकराचा संदेश येत नाही, पण तो आपली आठवण काढतो आहे. त्यामुळेच तर उचकी लागते आहे. या एका आनंदाच्या बळावर वाट पाहून सुकलेल्या मनाला रिझवणाऱ्या अनेक प्रेमी जीवाच्या मनातील घालमेल नव्याने गुलजार यांनी ‘आवे रे हिचकी’मधून रंगवली आहे. शंकर महादेवन यांचा तालमीतला आवाज आणि मामे खान यांच्या पहाडी आवाजाने या गाण्याला वेगळी उंची दिली आहे. ‘एक नदी थी, दोनो किनारे.. थामके वो बेहती थी’, हे गाणेही तितकेच अप्रतिम. हे गाणे म्हणजे साहिबाची खरी ओळख म्हणता येईल. साहिबाचा जीव मिर्झात अडकला आहे. पण म्हणून घरच्यांना सोडून मिर्झाच्या प्रेमाचा पैलतीर गाठणे तिला शक्य झाले नाही. एक किनारा सोडायचा तर दुसऱ्या किनाऱ्यावरचं वादळ आणि प्रवाह बदलायचा तर प्रवाहात येणारी प्रत्येक गोष्ट वाहून जाणार या भीतीने ती दोन्ही किनाऱ्यांना धरून संथ वाहत होती. ‘छोड ना सकती कोई किनारा.. एक नदी थी’, इतक्या सुंदर शब्दांत गुलजार यांनी साहिबाच्या मनातलं द्वंद्व पकडलं आहे. मनातलं हे वादळ साहिबाला कधीच शमवता आलं नाही. या चित्रपटातली ही तीन गाणी खऱ्या मिर्झा-साहिबाच्या कथेशी जोडणारी आहेत.

‘होता है.’ हे गाणे खरे म्हणजे गुलजारांच्या कथेतील मिर्झा आणि साहिबाची आहेत जी पडद्यावर दिसतात. तर ‘चकोर’ हे पुन्हा लोकगीताला नव्याने शब्दसाज चढवून आलेले गाणे आहे. दिव्यावर उडी घेतली की आपण संपणार, हे पतंगाला माहिती असतं. तरी दिव्याकडे त्याचं झेपावणं तो थांबवू शकत नाही. मिर्झाचं प्रेम हे साहिबासाठी त्या दिव्यावर उडी घेण्यासारखं आहे. चित्रपटात लोहारांच्या आळीत मिर्झा साहिबाची कथा रंगते. तिथेच त्या लोहारांच्या आळीत मिर्झाचं लाखमोलाचं प्रेम दडलेलं होतं. पण शेवटी प्रेमच ते..नाजूक वाटेने जाणारं. इथे मिर्झा लोहार आहे तर साहिबा राजकुमारी. राजकुमारीचं नुकसान होऊ नये म्हणून तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न क रूनही ती त्याच्यापर्यंत पोहोचते. प्रेमाच्या आवेगात उडी घेते. त्यांच्या उत्कट प्रेमाचं, आवेगाचं शब्दचित्रण करणारं हे गाणं थोडंसं आधुनिक सुरावटींच्या आवाजाने सजवलं आहे. ‘कागा रे’ ही दुसऱ्याशी लग्न ठरल्यानंतर साहिबाची होणारी तगमग दाखवणारं गाणं शास्त्रीय बाजात ऐकायला मिळतं. पण इथेही कौशिकी चक्रवर्ती यांचा वेगळा आवाज संगीतकाराने वापरला आहे. ‘डोली रे डोली’मध्ये पुन्हा एकदा शंकर महादेवन आणि मामेखान यांचा एकत्रित आवाज ऐकायला मिळतो. तीन गवाह है इश्क के.. हे या चित्रपटातलं एक अप्रतिम गाणं म्हणता येईल. मिर्झाचा हात धरून पळाल्यानंतर जेमतेम एक रात्र त्या दोघांनी एकत्रित काढली असेल. आपले भाऊ आपल्या मागावर आहेत याची जाण साहिबाला आहे. तिरंदाजीत कुशल असणाऱ्या मिर्झाचा एकेक तीर आपल्या भावांचा वेध घेणार हे तिला माहिती आहे. तिचं प्रेम जिवंत राहणार होतं मात्र प्रेमाच्या मेहंदीवर स्वजनांच्या रक्ताचे डाग तिला नको होते. त्या क्षणांत साहिबाने मिर्झाचे सगळे तीर अर्धवट मोडून टाकले. साहिबाच्या मनातलं भावनांचं वादळ शांत झोपलेल्या मिर्झाला समजलंच नाही. जेव्हा समजलं त्या एका शेवटच्या क्षणात साहिबाची आणि त्याची झालेली नजरानजर.. त्या दोघांशिवाय त्यांच्या प्रेमाचं सत्य जाणणारी ती एक तिसरी शक्ती मग त्याला आपण देवाचं नाव का ना देऊयात.. हे गाणं सिद्धार्थ महादेवन आणि सैन झहूर यांनी गायलं आहे. शब्द, सूर आणि स्वर या तिन्हींत वेगळेपणा असलेलं, लोकसंगीत आणि अत्याधुनिक सूरावट एकत्र आणणारी ‘मिर्झया’ची गाणी हे गुलजार यांच्या शब्दाने नटलेलं एक स्वतंत्र महाकाव्य आहे जे अनुभवल्याशिवाय पुढे जाता येणं शक्य नाही.