सध्या सिंगिग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चर्चेत आहे. कधी शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकारच शोवर जोरदार टीका करतात तर कधी माजी स्पर्धक निर्मात्यांच्या वागणुकीबाबत खुलासा करतात. पण आता ‘इंडियन आयडल १२’चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शो चर्चेत आहे. तर त्याच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

आदित्यने ‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर अलिबागवरुन टोला लगावला होता. त्यानंतर अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला असून यापुढे अलिबागबद्दल असं काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा इशारा दिला आहे.

आणखी वाचा : ‘धक्कादायकच, कारण…’, अमित कुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन

‘मी आदित्य नारायण सूत्रसंचालन करत असलेल्या शोचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो स्पर्धकाला बोलता बोलता असं म्हणाला की रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा… आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का? याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. आजकाल जो उठतो तो सरळ हिंदी वाहिन्यांवर हम आलिबागसे आये है क्या… असा उल्लेख करतो. परंतु या लोकांना अलिबागचा इतिहास, इथली संस्कृती माहिती नाही. उद्या आमच्या आलिबागच्या लोकांचे डोके फिरले तर ते या शोचं काय करतील? ते एक हिंदीची गोष्ट चालून देणार नाहीत. हा अलिबागकरांचा अपमान आहे. या कृतीचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत’ असे खडेबोल अमेय खोपकर यांनी सुनावले आहेत.

पुढे ते म्हणाले की, ‘आदित्यचा उद्धटपणा वाढत चालला आहे. त्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पण अलिबागच्या लोकांचा आणि अलिबागचा अपमान सहन केला जाणार नाही. सोनी वाहिनीने आगामी भागामध्ये अलिबाग येथील नागरिकांची माफी मागावी. यापुढे मै अलिबाग से आया हू क्या असे कोणत्याही चॅनेलवर ऐकू आलं तर पत्र, विनंती, लाइव्ह नाही थेट कानाखाली आवाज काढणार.’