महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्बंध लागू केल्यानंतर अनेक मालिकांचं शूटिंग ठप्प पडलं. प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी, त्यांतं मनोरंजन करण्यासाठी हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांच्या निर्मात्यांनी गोवा, हैदराबाद, कर्नाटक, सिल्वासा अशा विविध राज्यांत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

मालिकांमधील निवडक कलाकार आणि तंत्रज्ञांचा चमू बाहेरगावी चित्रीकरणासाठी पोहोचला असून या आठवड्यात नवीन ठिकाणी चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या अनेकांचं नुकसान होत असल्याचं त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे.

अमेय खोपकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत, ” हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचं चित्रीकरण राज्याबाहेर म्हणजेच गोवा, दमण अशा ठिकाणी सुरु होतंय. निर्मात्यांचा नाईलाज समजू शकतो, पण बरेचसे तंत्रज्ञ तसंच कामगार यांना ‘लहान युनिटचा बहाणा करत’ घरीच बसवून वाऱ्यावर सोडून देण्यात आलंय. रंजक वळणावर असलेल्या मालिकांचा प्रेक्षक दुरावू नये याची काळजी करतानाच आपल्याचं सहकार्यांची उपासमार करतोय याचं भान निर्मात्यांनी ठेवलंच पाहिजे.” असं ट्विट करत अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केलीय.

गेल्या दोन दिवसात अनेक मालिकांच्या टीम महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणासाठी रवाना झाल्या आहेत. “आम्ही निर्मितीच्या खर्चात वाढ करत बाहेर चित्रीकरणाची तयारी केली आहे. सध्या परराज्यात तेथील नियम पाळून चित्रीकरणस्थळीच राहून काम पूर्ण करणेही शक्य होते आहे. इथून जाणाऱ्या कलाकारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेण्यात आल्या आहेत. ज्यांना करोनाची लागण झालेली नाही किंवा लक्षणे नाहीत अशांना घेऊनच बाहेरगावी चित्रीकरण करण्यात येत आहे”, अशी माहिती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी दिली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिकांचे चित्रीकरण बाहेरच्या राज्यांमध्ये सुरू झाले आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक, बेळगाव अशा ठिकाणी मालिका आणि त्यांचे कलाकार-तंत्रज्ञ पोहोचले आहेत, अशी माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली