मानसी जोशी
‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘फोटोग्राफ’, ‘रमन राघव’, ‘सेक्रेड गेम्स’सारखे चित्रपट आणि वेबसीरिज यातून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका करत अभिनयाची छाप पाडणारा नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलीवूडमध्ये हुकमाचा एक्का समजला जातो. शून्यापासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणारा नवाज हा आज लंबी रेस का घोडा आहे. स्वत:ची स्पष्ट मतं, काम करण्याची वेगळी पद्धत आणि यशाच्या शिखरावर असूनही वास्तवाची जाणीव या वैशिष्टय़ांमुळे तो प्रेक्षकांना भावतो. दिवाळीच्या सुट्टीत ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत तो विनोदी भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली बातचीत..
आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकी ने ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात पुष्पींदरची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात त्याने अथिया शेट्टीसोबत काम केले आहे. चित्रीकरणादरम्यान मला पुष्पींदर ही भूमिका समजून घ्यावी लागली. अथिया ही नवीन पिढीची अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना मजा आली. माझ्यापेक्षा तिला सगळे संवाद पाठ असायचे. आपल्या भूमिकेची तिने आधीच पूर्वतयारी करून ठेवली असल्याने अवघड गेले नाही. एखादा कलाकार भूमिकेची पूर्वतयारी करतो, त्यासाठी मेहनत घेतो. अशा सहकलारांसोबत काम करण्यात अडचण येत नाही, असे तो म्हणतो.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत सारा अली खान, रणबीर कपूर, अनन्या पांडे, आलिया भट, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ असे नवे-जुने स्टार कलाकार काम करत आहेत. त्यांच्याकडे विविध गुण आहेत. प्रेक्षकांची नस ते बरोबर ओळखून आहेत. त्यांना इतर कलाकारांपेक्षा चित्रपट लवकर मिळाले आहेत. यामध्ये जो चांगले काम करेल तोच पुढे जाईल असे त्याचे स्पष्ट मत आहे.
चित्रपटातील नायिकेला परदेशातील मुलाशी लग्न करायचे असते. एनआरआय नवरा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेली नायिका यात पाहायला मिळते. वास्तवातही लोक परदेशी जाण्यासाठी उत्सूक असतात. भारताच्या तुलनेत तेथील जीवनशैली त्यांना आकर्षित करते. नवाजला पहिल्यापासूनच परदेशाचे आकर्षण नव्हते. अमुक एका चित्रपटासाठी परदेशात चित्रीकरण करायला पाहिजे असाही त्याचा हट्ट नसतो. पहिल्यांदा काही कामासाठी दुबईला गेलो होतो. तेव्हा खूप आकर्षण होते. परंतु नंतर चित्रीकरणासाठी अनेक वेळा परदेशी जायला लागले. त्यामुळे याचे विशेष अप्रूप वाटत नाही. परंतु आता कुटुंबालाही परदेशी फिरायला घेऊन जातो, त्याचा आनंद वेगळा आहे असे त्याने सांगितले.
तो छोटय़ा गावातून आला असल्याने तेथील जीवनशैली त्याला प्रिय आहे. उत्तर प्रदेशमधील बुधाना गावात गेल्यावर तो आजही शेतीचे काम करतो. त्याचे कुटुंब गावातील जमीनदार होते. काही वर्षांपूर्वी गावकरी मला वडिलांच्या नावाने ओळखत होते. आता माझ्या नावाने कुटुंबाला ओळखतात. त्यामुळे मी केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. गावात गेल्यावर मुलं माझ्यासोबत छायाचित्रं काढतात. हे बघून आईला अत्यंत आनंद होतो, असं तो मनापासून सांगतो.
नवाजुद्दीन आपल्या चित्रपटांची निवड अत्यंत जाणीवपूर्वक करतो. सुरुवातीच्या काळात मी असं ठरवलं होतं की आशयघन, कथानक चांगले असलेले चित्रपट करणार. परंतु आपल्या देशात आशयघन चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. आयुष्यातील निराशा, धावपळ यातून दोन घटकांचे मनोरंजन होण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतात. त्यामुळे चित्रपट हा मनोरंजनात्मक असायला पाहिजे. चित्रपटात थोडी गाणी, विनोद, मारामारी असली तर तो प्रेक्षकांना आवडतो हे आता कळायला लागले आहे. आणि असेच चित्रपट गल्लाबारीवर यशस्वी ठरत असल्याने आशयघन आणि थोडे मनोरंजनात्मक चित्रपट करण्याचे ठरवले असल्याचे त्याने स्पष्ट के ले.
सध्या इंटरनेटमुळे प्रेक्षकाची निवांतपणे चित्रपट पाहण्याची सवय मोडलेली आहे. हातात रिमोट कंट्रोल आल्याने नाही आवडल्यास त्याला त्याच्या आवडीचा दुसरा कार्यक्रम बघता येतो. ‘फोटोग्राफ’ हा असाच संथ लयीचा चित्रपट होता. यातील नायक-नायिकांमधील प्रेम प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने साधारण कमाई केली होती, असा अनुभव सांगत सध्या लोकांना वेगवान शैली असलेले चित्रपट आवडतात, असे निरीक्षणही त्याने नोंदवले.
सध्या ‘रोम रोम मे’ हा आशयघन चित्रपट केला आहे. अनेक चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला असल्याचे त्याने सांगितले. चित्रपट महोत्सवाचा विषय निघताच त्याने मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचाही उल्लेख केला. देशात उत्तमोत्तम चित्रपट महोत्सव आयोजित केले पाहिजेत. चित्रपट महोत्सवात जगभरातील विविध भाषांचे चित्रपट दाखवले जातात. यामुळे जगात कोणते विषय हाताळले जात आहेत, याची कल्पना येते. नवीन नवीन दिग्दर्शक तंत्रज्ञ यांची भेट होते. त्याआधारे हिंदी तसेच प्रादेशिक भाषांतही उत्कृष्ट चित्रपट तयार केले जातात. ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवायला पाहिजे. परंतु अनेकदा चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले खूप कमी चित्रपट पुढे येतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. निर्माता न मिळाल्याने अनेक चांगले कथानक असलेले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. चित्रपट महोत्सवात येणारा प्रेक्षक हा एका वर्गाचा असल्याने त्याला मर्यादा येतात. तरी आता महोत्सवातील चित्रपट प्रदर्शित होत आहेत, याबद्दल एकाच वेळी खंत आणि समाधानही तो व्यक्त करतो.
नवाजुद्दीन मराठी चित्रपट आवडीने पाहतो. ‘कोर्ट’ हा त्याचा आवडीचा चित्रपट असल्याचे तो आवर्जून नमूद करतो. त्यामध्ये मला सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका करायला आवडेल. त्याने यापूर्वी केलेली बाळासाहेब ठाकरेंची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. मराठी मला व्यवस्थित समजते परंतु बोलता येत नाही. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मराठी चित्रपट पाहिले. ‘फँ ड्री’, ‘सैराट’, ‘गाभ्रीचा पाऊस’ हे चित्रपट पाहिले. दाक्षिणात्य चित्रपटाबरोबरच मराठीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग होत आहेत. येथील कलाकार नवीन विषय हाताळत आहेत. हिंदीसोबत प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
चित्रपट समीक्षणाबद्दल तो परखडपणे भाष्य करतो. सध्या चित्रपटाबद्दल माहिती नसलेले चित्रपटावर भाष्य करतात याबद्दल माझा आक्षेप आहे, असं तो म्हणतो. आज मी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चा विद्यार्थी आहे. चार वर्षे मी अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. मी अभिनयाने साक्षर आहे. त्यामुळे ज्याला चित्रपटाबद्दल कळते त्याचेच म्हणणे मी ऐकून घेतो. चित्रपटात नृत्य, अभिनयासाठी प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे खूप कमी समीक्षकांची चित्रपटाची समीक्षणे वाचतो. समीक्षणे वाचून प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊ नये. कारण समीक्षणे वाचून आपण एक मत बनवतो. परंतु अनेक वेळा ते चुकीचे असू शकते, असे सांगतानाच चित्रपट पाहायचा की नाही हे समीक्षणावरून ठरवू नये, असंही तो जाणीवपूर्वक सांगतो.
सुरुवातीच्या काळात मी असं ठरवलं होतं की आशयघन, कथानक चांगले असलेले चित्रपट करणार. परंतु आपल्या देशात आशयघन चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. आयुष्यातील निराशा, धावपळ यातून दोन घटकांचे मनोरंजन होण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतात. त्यामुळे चित्रपट हा मनोरंजनात्मक असायला पाहिजे. चित्रपटात थोडी गाणी, विनोद, मारामारी असली तर तो प्रेक्षकांना आवडतो हे आता कळायला लागले आहे. आणि असेच चित्रपट गल्लाबारीवर यशस्वी ठरत असल्याने आशयघन आणि थोडे मनोरंजनात्मक चित्रपट करण्याचे ठरवले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी